YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 10:6-16

शास्ते 10:6-16 MARVBSI

मग इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले; बआलीम व अष्टारोथ ह्या दैवतांची आणि अराम, सीदोन, मवाब, अम्मोनी व पलिष्टी ह्या सर्वांच्या दैवतांची ते सेवा करू लागले; त्यांनी परमेश्वराचा त्याग केला; त्याची सेवा ते करीनात, म्हणून परमेश्वराचा कोप इस्राएलावर भडकला आणि त्याने त्यांना पलिष्ट्यांच्या व अम्मोन्यांच्या हाती दिले. यार्देनेच्या पलीकडे अमोर्‍यांच्या देशातील गिलाद प्रांतात राहणार्‍या सर्व इस्राएल लोकांना त्यांनी तेव्हापासून अठरा वर्षे हैराण करून त्यांच्यावर जुलूम केला. अम्मोनी लोक यार्देन ओलांडून यहूदा, बन्यामीन व एफ्राइमाचे घराणे ह्यांच्यावर स्वार्‍या करत. ह्यामुळे इस्राएल लोक फार बेजार झाले होते. मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा करून म्हटले, “आम्ही आमच्या देवाचा त्याग केला आणि बआलदैवतांची सेवा करून आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे.” तेव्हा परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मी तुम्हांला मिसरी, अमोरी, अम्मोनी व पलिष्टी ह्यांच्या तावडीतून सोडवले; तसेच सीदोनी, अमालेकी व मिद्यानी ह्यांनी तुम्हांला हैराण केले तेव्हा तुम्ही माझा धावा केला आणि मी तुम्हांला त्यांच्या हातून सोडवले, नाही का? तरी तुम्ही मला सोडले आणि अन्य देवांची सेवा केली म्हणून ह्यापुढे मी तुमची मुक्तता करणार नाही. जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.” तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.” मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.