दानीएल 4:10-18
दानीएल 4:10-18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी माझ्या पलंगावर पडलो असता मला दिसले ते असे, मी पाहिले, पृथ्वीच्या मधोमध एक मोठा वृक्ष होता आणि त्याची उंची खूप मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला त्याचा शेंडा आकाशात पोहचला आणि त्याचा देखावा सर्व पृथ्वीच्या सीमेपर्यंत पोहचला. त्याची पाने सुंदर होती, त्यास भरपूर फळे असून ती सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशु त्याच्या सावलीत आणि आकाशातील पक्षी त्याच्या फांद्यामध्ये राहत. तो वृक्ष सर्व जिवितांचे पोषण करीत असे. मी माझ्या बिछान्यात पडलो असता माझ्या मनात पाहिले आणि एक पवित्र देवदूत आकाशातून खाली उतरला. तो मोठ्याने ओरडून म्हणाला हा वृक्ष तोडून टाका आणि त्याच्या फांद्या छाटून टाका, त्याची पाने काढून टाका आणि फळे विखरा, त्याच्या खाली राहणारे प्राणी पळून जावो आणि फांद्यांतील पाखरे उडून जावोत. पण त्याचा बुंधा जमिनीत राहू दया. त्यास लोखंड आणि पितळेच्या पट्टया बांधून, कुरणाच्या कोवळ्या गवतात राहू द्या. त्यास आकाशातील दहीवरात भिजू द्या, वनपशुंबरोबर त्यास भूमीवरील गवताचा वाटा मिळू द्या. त्याचे मानवी हृदय जावून त्यास प्राण्याचे हृदय प्राप्त होवो, तो पर्यंत सात वर्षे होऊन जातील. हा निर्णय त्या देवदुताच्या घोषणेद्वारे आणि पवित्रजनांच्या विचाराने झाला आहे, यासाठी की मनुष्याच्या राज्यात परात्पर प्रभुत्व करतो, आणि ज्या कोणाला ते द्यायला तो इच्छितो त्यास तो ते देतो, आणि त्यावर मनुष्यातल्या सर्वांहून नीच अशा मनुष्यास तो स्थापतो, असे जिवंतांनी जाणावे. हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आता तू हे बेल्टशस्सरा ह्याचा अर्थ मला सांग कारण माझ्या राज्यातल्या ज्ञानी जनांपैकी कोणीही ह्याचा अर्थ सांगू शकत नाही, पण तू हे सांगू शकतोस, कारण देवाचा पवित्र आत्मा तुझ्याठायी राहतो.
दानीएल 4:10-18 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे. “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे. त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत. परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या. “ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या. सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो. “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’ “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.”
दानीएल 4:10-18 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी आपल्या पलंगावर पडलो असता माझ्या मनात जे दृष्टान्त घोळत होते ते हे : मी पाहिले, तेव्हा पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष होता, त्याची उंची फार मोठी होती. तो वृक्ष वाढून मजबूत झाला, त्याची उंची गगनास पोहचली व तो सगळ्या पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दिसू लागला. त्याला सुंदर पाने होती, त्यावर फळे विपुल असून सर्वांना खायला पुरेशी होती. वनपशू त्याच्या आश्रयाने राहत, अंतराळातील पक्षी त्याच्या शाखांमध्ये वस्ती करीत व त्या वृक्षावर सर्व मनुष्यांचे पोषण होत असे. मी पलंगावर पडलो असता माझ्या मनात दृष्टान्त घोळत होते, त्यांत मी पाहिले की एक जागल्या, पवित्र पुरुष, आकाशातून उतरला. तो मोठ्याने पुकारून म्हणाला, ‘हा वृक्ष तोडून टाका, ह्याच्या फांद्या छेदा, ह्याची पाने झाडून टाका व ह्याची फळे विखरा; ह्याच्याखाली राहत असलेले पशू निघून जावोत व पक्षी ह्याच्या शाखांतून उडून जावोत. तरीपण ह्याचे बुंध जमिनीत राहू द्या; ह्याला लोखंड व पितळ ह्यांच्या पट्ट्याने बांधून रानातल्या कोवळ्या गवतात राहू द्या; ह्याला आकाशातल्या दहिवराने भिजू द्या; भूमीवरील गवताचा वाटा ह्याला वनपशूंबरोबर मिळो; ह्याचे मानवहृदय जाऊन ह्याला पशुहृदय प्राप्त होवो व सात काळ त्याच्यावरून जावोत. हे शासन त्या जागल्यांच्या ठरावान्वये व पवित्र जनांच्या वचनानुसार झाले; ते अशासाठी की मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो आणि त्यावर अगदी हलक्या प्रतीच्या मनुष्यांपैकी पाहिजे त्याला नेमतो, हे सर्व जीवधार्यांना समजावे.’ हे स्वप्न मी नबुखद्नेस्सर राजाने पाहिले आहे; तर आता हे बेल्टशस्सरा, ह्याच्या अर्थाचा उलगडा कर, कारण माझ्या राज्यातील सर्व ज्ञानी पुरुषांना ह्याचा अर्थ मला सांगता आला नाही; पण तुला सांगता येईल, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्या ठायी आहे.”