YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:10-18

दानीएल 4:10-18 MRCV

मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे. “मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत खाली येत आहे. त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत. परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या. “ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या. सात वर्षापर्यंत, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो. “ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’ “हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.”

दानीएल 4 वाचा