प्रेषितांची कृत्ये 20:7-12
प्रेषितांची कृत्ये 20:7-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता, तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला. माडीवरच्या ज्या खोलीत आम्ही जमा झालो होतो तेथे पुष्कळ दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला. पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.” मग पौल वर गेला, त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली, पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.
प्रेषितांची कृत्ये 20:7-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला. वरच्या मजल्यावरील ज्या खोलीत आम्ही जमलो होतो, तिथे पुष्कळ दिव्यांचा प्रकाश होता. तेव्हा पौल बोलत राहिल्यामुळे युतुख नावाचा कोणी एक तरुण खिडकीत बसला असता, त्याला गुंगी येऊन गाढ झोप लागली. तो गाढ झोपेत असताना, तिसर्या मजल्यावरून खाली जमिनीवर पडला आणि त्यास उचलले तेव्हा तो मरण पावला आहे असे दिसून आले. तेव्हा पौल खाली गेला आणि त्या तरुणावर पाखर घालून आपल्या हाताने कवटाळले व म्हणाला, “भयभीत होऊ नका, तो जिवंत आहे!” मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला. लोक त्या तरुणाला जिवंत घरी घेऊन आले म्हणून त्यांना अतिशय समाधान वाटले.
प्रेषितांची कृत्ये 20:7-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग आम्ही आठवड्याच्या पहिल्या दिवशी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो तेव्हा पौलाने त्यांच्याबरोबर भाषण केले; तो दुसर्या दिवशी जाणार होता आणि त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबवले. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो तेथे बरेच दिवे होते. आणि युतुख नावाचा कोणीएक तरुण खिडकीत बसला असता झोपेने गुंगला होता. तेव्हा पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे तो झोपेच्या गुंगीत तिसर्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि त्याच्यावर पाखर घालून व त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका; कारण हा अजून जिवंत आहे.” मग त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटपर्यंत त्यांच्याबरोबर संभाषण केले व तो तसाच निघून गेला. त्या तरुणाला जिवंत नेता आल्यामुळे त्यांना फार समाधान वाटले.
प्रेषितांची कृत्ये 20:7-12 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आम्ही शनिवारी सायंकाळी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौलाने त्यांच्यापुढे भाषण केले. त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले, कारण तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो, तेथे बरेच दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने त्याचे डोळे जड होऊ लागले. पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे युतुख झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि स्वतःला त्याच्यावर झोकून देऊन त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका, हा अजून जिवंत आहे.” त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर बोलत राहिला व नंतर तो तेथून निघून गेला. त्या तरुणाला जिवंत घरी नेता आल्यामुळे त्यांना फार बरे वाटले.