प्रेषितांचे कार्य 20:7-12
प्रेषितांचे कार्य 20:7-12 MACLBSI
आम्ही शनिवारी सायंकाळी भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो, तेव्हा पौलाने त्यांच्यापुढे भाषण केले. त्याने आपले भाषण मध्यरात्रीपर्यंत लांबविले, कारण तो दुसऱ्या दिवशी जाणार होता. ज्या माडीवर आम्ही एकत्र जमलो होतो, तेथे बरेच दिवे होते. युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला असता झोपेने त्याचे डोळे जड होऊ लागले. पौल फार वेळ भाषण करत राहिल्यामुळे युतुख झोपेच्या गुंगीत तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला व मेलेला हाती लागला. तेव्हा पौल खाली उतरला आणि स्वतःला त्याच्यावर झोकून देऊन त्याला कवटाळून म्हणाला, “घाबरू नका, हा अजून जिवंत आहे.” त्याने वर येऊन भाकर मोडून खाल्ल्यावर बराच वेळ म्हणजे पहाटेपर्यंत त्यांच्याबरोबर बोलत राहिला व नंतर तो तेथून निघून गेला. त्या तरुणाला जिवंत घरी नेता आल्यामुळे त्यांना फार बरे वाटले.

