YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 14:8-28 - Compare All Versions

प्रेषितांची कृत्ये 14:8-28 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून. मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला. पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले, ते म्हणाल, “देव मनुष्यांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.” लोकांनी बर्णबाला ज्यूपितर म्हटले व पौलाला मर्क्युरी म्हटले, कारण पौल मुख्य बोलणारा होता. ज्यूपितरचे मंदिर जवळ होते, या मंदिराचा पुजारी काही बैल व फुले घेऊन वेशीजवळ आला, पुजारी व लोकांस पौल व बर्णबा यांची उपासाना करण्यासाठी त्यांच्यापुढे बळी द्यावयाचा होता. परंतु ते काय करीत आहेत, हे जेव्हा प्रेषित पौल व बर्णबा यांना समजले तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले व लोकांच्या गर्दीत शिरले आणि मोठ्याने म्हणाले. लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले. भूतकाळात, देवाने सर्व राष्ट्रांना त्यांना जसे पाहिजे तसे वागू दिले. परंतु देवाने अशा गोष्टी केल्या, की त्याद्वारे तो खरा आहे हे सिद्ध व्हावे, तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करतो, तो तुम्हास आकाशातून पाऊस देतो, योग्यवेळी तो तुम्हास चांगले पीक देतो, तो तुम्हास भरपूर अन्न देतो व तो तुमची अंतःकरणे आनंदाने भरतो. पौल व बर्णबाने या गोष्टी लोकांस सांगितल्या व मोठ्या प्रयासाने आपणास यज्ञ अर्पिण्यापासून त्याना परावृत्त केले. नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले, त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली आणि पौलाला दगडमार केला, त्यामध्ये पौल मरण पावला असे समजून त्यांनी त्यास ओढत नेऊन नगराबाहेर टाकले. पण शिष्य पौलाभोवती जमा झाल्यावर पौल उठून परत शहरात गेला व दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे शहरास गेले. आणि त्या नगरात त्यांनी सुवार्ता सांगून अनेक लोकांस शिष्य केले, त्यानंतर ते लुस्र, इकुन्या आणि अंत्युखिया नगरांना परत आले. आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.” पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले. पौल आणि बर्णबा पिसिदिया प्रदेशातून गेले नंतर ते पंफुलिया येथे आले. त्यांनी पिर्गा शहरात देवाचा संदेश दिला नंतर ते अत्तलिया शहरात गेले. नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया प्रांतातील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले, जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती. ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील परराष्ट्रीय लोकांमध्ये देवाने विश्वासाचे द्वार कसे उघडले ते सांगितले. नंतर ते विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर तेथे बरेच दिवस राहिले.

प्रेषितांची कृत्ये 14:8-28 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

त्यांना लुस्त्र मध्ये पांगळा मनुष्य बसलेला आढळला. तो जन्मापासूनच पांगळा असून कधीही चालू शकला नव्हता. पौल बोलत असताना तो ऐकत होता. पौलाने त्याच्याकडे सरळ निरखून पाहिले आणि बरा होण्यासाठी लागणारा विश्वास त्याच्याकडे आहे असे त्याला दिसले. तेव्हा त्याने मोठ्याने म्हटले, “तुझ्या पायांवर उठून उभा राहा!” त्याच क्षणाला त्या मनुष्याने उडी मारली आणि तो चालू लागला. पौलाने केलेले कृत्य पाहून जमाव लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून म्हणाला, “परमेश्वर आमच्यामध्ये मनुष्य रूपाने उतरून आले आहेत!” बर्णबाला त्याने झूस या नावाने व पौल हा मुख्य वक्ता असल्यामुळे त्याला हेर्मेस असे म्हटले. शहराच्या बाहेर असलेल्या झूस मंदिरातील पुजार्‍याने, बैल आणि फुलांच्या माळा घेतल्या व शहराच्या वेशीजवळ आले, कारण त्याला आणि जनसमुदायाला, त्यांना यज्ञार्पणे करावयाची होती. परंतु ज्यावेळी प्रेषित बर्णबा व पौल यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी स्वतःची वस्त्रे फाडली व धावत लोकांमध्ये शिरून ते ओरडून म्हणाले: “मित्रांनो, तुम्ही हे कशासाठी करीत आहात? आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत. आम्ही तुमच्यासाठी जी शुभवार्ता आणली आहे ती तुम्हाला सांगतो, यासाठी की तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून देऊन, ज्याने आकाश, पृथ्वी, सागर व त्यातील सर्वकाही निर्माण केले त्या जिवंत परमेश्वराकडे वळावे. मागील काळात, त्यांनी सर्व राष्ट्रांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिले; तरी त्यांनी स्वतःच्या अस्तित्वाची साक्ष दिली: त्यांच्याच दयेने तुमच्यासाठी आकाशातून पाऊस पाडतात, ऋतूमध्ये पीक देतात; ते तुम्हाला भरपूर अन्न पुरवितात आणि तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतात.” परंतु इतके बोलल्यानंतरही, लोकांना यज्ञ करण्यापासून आवरणे त्यांना अत्यंत कठीण गेले. तेव्हा काही यहूदी अंत्युखिया आणि इकुन्या येथून आले आणि त्यांनी समुदायाला त्यांच्या बाजूने करवून घेतले. त्यांनी पौलाला धोंडमार केला आणि तो मरण पावला आहे असे समजून त्याला शहराबाहेर फरफटत ओढून नेले. परंतु शिष्य त्याच्या अवतीभोवती उभे राहिले, तेव्हा तो उठला आणि पुन्हा त्या शहरात गेला. दुसर्‍या दिवशी तो आणि बर्णबा दर्बेकडे निघून गेले. त्यांनी त्या शहरात शुभवार्तेचा प्रचार करून मोठ्या संख्येने शिष्य बनविले. नंतर ते लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया या शहरात परत आले. त्यांनी शिष्यांना बळकटी येण्यासाठी आणि विश्वासात एकनिष्ठतेने टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले, कारण “परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी आपल्याला अनेक संकटातून गेले पाहिजे,” असे ते म्हणाले. पौल आणि बर्णबाने प्रत्येक मंडळीमध्ये वडिलांची नेमणूक केली आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्या प्रभूला त्यांचे समर्पण केले. नंतर पिसिदियामधून जात असताना ते पंफुल्यात आले, आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले. अत्तलियाहून ते तारवात बसून अंत्युखियास आले, आता जे कार्य त्यांनी पूर्ण केले होते त्यासाठी याच ठिकाणी त्यांना परमेश्वराच्या कृपेवर सोपविण्यात आले होते. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्याद्वारे केले व गैरयहूदीयांसाठी देखील विश्वासाचे दार कसे उघडले, याचा अहवाल सादर केला. आणि तिथे ते शिष्यांबरोबर पुष्कळ दिवस राहिले.

प्रेषितांची कृत्ये 14:8-28 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

लुस्त्रात पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे; पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून, मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलला, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.” त्यांनी बर्णबाला ‘ज्यूपिटर’ म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला ‘मर्क्युरी’ म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजार्‍याने बैल व माळा दरवाजांजवळ आणल्या; आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, “गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत; तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ‘ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील अवघे निर्माण केले’ त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालू दिले; तथापि त्याने स्वत:स साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला दिले, आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त केले.” असे बोलून त्यांनी आपणांला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. नंतर अंत्युखिया व इकुन्या येथून कित्येक यहूदी आले; त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात निघून आला; मग दुसर्‍या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बेस गेला. त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र, इकुन्या व अंत्युखिया ह्या नगरांत ते परत आले; आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’ त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले; आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले. आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले; जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.

प्रेषितांची कृत्ये 14:8-28 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.” त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते. हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले, “गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. त्याने त्याच्या सत्कृत्यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सादर केले आहेत. तो आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला देतो आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त करतो.” असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. पिसिदियामधील अंत्युखिया येथून व इकुन्य येथून कित्येक यहुदी आले, त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला, असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात आला. दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला. त्या नगरात शुभवर्तमान घोषित करून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवल्यावर लुस्त्र, इकुन्य व पिसिदियामधील अंत्युखिया या नगरांत ते परत आले. शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.” त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले. ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले. तेथे ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.