प्रेषितांचे कार्य 14:8-28
प्रेषितांचे कार्य 14:8-28 MACLBSI
त्या वेळी लुस्त्रा येथे पायांनी अधू असा एक माणूस होता. तो जन्मतः पांगळा होता व कधीच चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत बसला होता. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे होऊ, असा विश्वास आहे, असे पाहून मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा.” तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत ओरडून बोलले, “देव माणसाच्या रूपाने आपल्यामध्ये उतरले आहेत.” त्यांनी बर्णबाला ज्यूपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. नगरापुढे असलेल्या ज्यूपिटरच्या याजकाने बैल व फुले प्रवेशद्वाराजवळ आणली. लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे, असे त्याच्या मनात होते. हे ऐकून बर्णबा व पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून ओरडून म्हटले, “गृहस्थांनो, हे का करता? आम्ही व तुम्ही मर्त्य माणसे आहोत, तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यांतील सर्वकाही निर्माण केले. त्या जिवंत देवाकडे वळावे, असे शुभवर्तमान आम्ही तुम्हांला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. त्याने त्याच्या सत्कृत्यांद्वारे त्याच्या अस्तित्वाचे पुरावे सादर केले आहेत. तो आकाशातून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हांला देतो आणि अन्नाने व हर्षाने तुम्हांला मन भरून तृप्त करतो.” असे सांगून त्यांनी आपणाला बलिदान अर्पण करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. पिसिदियामधील अंत्युखिया येथून व इकुन्य येथून कित्येक यहुदी आले, त्यांनी लोकांचे मन वळवून पौलाला दगडमार केला आणि तो मरण पावला, असे समजून त्याला नगराबाहेर ओढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला व नगरात आला. दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दर्बे येथे गेला. त्या नगरात शुभवर्तमान घोषित करून त्यांनी पुष्कळ शिष्य मिळवल्यावर लुस्त्र, इकुन्य व पिसिदियामधील अंत्युखिया या नगरांत ते परत आले. शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला, “विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांतून देवाच्या राज्यात जावे लागते.” त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक ख्रिस्तमंडळीत वडीलजन निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता, त्याच्याकडे त्यांना सोपवले. ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलियास उतरले. तेथून ते अंत्युखियास जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते, त्याकरिता त्यांना येथूनच देवाच्या कृपेवर सोपवून पाठविण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी ख्रिस्तमंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि यहुदीतरांकरिता विश्वासाचे दार कसे उघडले, हे सांगितले. तेथे ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.

