YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 8:22-53

१ राजे 8:22-53 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला व इस्राएलाच्या सर्व मंडळीसमोर दोन्ही हात आकाशाच्या दिशेने पसरले, तो म्हणाला, हे इस्राएलाच्या परमेश्वर देवा, तुजसमान दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास, कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस, जे सेवक तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस. माझे वडिल दावीद या आपल्या सेवकाला तू वचन दिलेस, आणि ते खरे करून दाखवलेस. आपल्या मुखाने तू वचन दिलेस आणि तुझ्याच हाताने ते पूर्ण केले आहे; अशी आज वस्तुस्थिती आहे. माझ्या वडिलांना दिलेली इतर वचनेही हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तू खरी करून दाखव तू म्हणाला होतास, दावीद, तुझ्याप्रमाणेच तुझ्या मुलांनीही माझा मार्ग अनुसरला, तर तुमच्या घराण्यातील पुरूषांची परंपरा कधीही खुंटावयाची नाही, एकजण नेहमी इस्राएलाच्या राजासनावर राहील. परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, हा माझे वडिल दाविदाला दिलेला शब्दही खरा ठरु दे अशी माझी प्रार्थना आहे. पण परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीवर राहशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यातही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी कसे पुरेल! पण कृपाकरून माझी प्रार्थना व कळकळीची विनंती ऐक. मी तुझा सेवक आणि तू माझा परमेश्वर देव आहेस. आजची ही माझी प्रार्थना ऐक. माझ्या नावाचा निवास याठिकाणी होईल, असे ज्या ठिकाणाविषयी तू म्हटले त्या या ठिकाणाकडे रात्रंदिवस या मंदिराकडे तुझी दृष्टी असू दे, जी प्रार्थना तुझा सेवक या स्थळाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. परमेश्वरा, इस्राएलाचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करू तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात आहे हे आम्हास माहित आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हास क्षमा कर. जर एखादया व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याविरूद्ध काही अपराध केल्यास त्यास शपथ घ्यावयास लावल्यास व या तुझ्या वेदीसमोर घेतली. तेव्हा ती तू स्वर्गातून ऐकून निवाडा कर. जर तो अपराधी असेल तर त्यास त्याप्रमाणे शिक्षा कर. आपल्या सेवकाचा न्याय करून दुष्टास दुष्ट ठरव व त्याची कृत्ये त्याच्या माथी येवो आणि धार्मिकास निर्दोष ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्यास बक्षिस देऊन त्याचे समर्थन कर. जेव्हा इस्राएल लोकांचा तुझ्याविरूद्धच्या पापामुळे शत्रूंच्या हातून पराभव होईल व ते त्यांच्या पापापासून मागे फिरतील, तुझ्या नावाने पश्चाताप करतील, प्रार्थना विनंती करून या मंदिरात क्षमा मागतील; तेव्हा स्वर्गातून तू त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना देऊ केला त्यामध्ये त्यांना तू परत आण. त्यांनी तुझ्याविरूद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली व पाऊस पडला नाही. तेव्हा ते जर या ठिकाणाकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील व तुझे नाव कबूल करतील व तू दीन केल्यामुळे तुझ्याकडे वळतील, तेव्हा स्वर्गातून इस्राएली लोक व तुझे सेवक त्यांची विनवणी ऐकून त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांना योग्य मार्गाने चालायला शिकव, आणि परमेश्वरा, तू त्यांना वतन म्हणून दिलेल्या भूमीवर पाऊस पडू दे. कधी जमीन ओसाड होऊन त्यावर कोणतेही पीक येणार नाही, किंवा एखादा साथीचा रोग पसरेल. कधी टोळधाड, भेरड, घुली येऊन सगळे पीक फस्त करतील. कधी शत्रूच्या हल्ल्याला काही ठिकाणचे लोक बळी पडतील, किंवा एखाद्या दुखण्याने लोक हैराण होतील. असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली किंवा सर्व इस्राएली लोकांनी आपल्या जीवाला होणारा त्रास ओळखून मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना करतील. तर त्यांची प्रार्थना स्वर्गातून ऐकून त्यांना क्षमा कर आणि कृती कर. लोकांच्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर. आमच्या पूर्वजांना तू जी भूमी दिलीस तिथे लोकांनी त्यांचे वास्तव्य तिथे असेपर्यंत तुझा आदर ठेवून व भय धरुन रहावे म्हणून एवढे कर. इस्राएली लोकांशिवाय तुझ्या नावासाठी परदेशाहून कोणी आला, कारण तुझे महान नाव बलशाली हात व पुढे केलेला बाहू ही सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच, व त्यांनी या मंदिराकडे येऊन प्रार्थना केली, तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांसही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांस कळेल. परमेश्वरा, कधी तू आपल्या लोकांस शत्रूवर चढाई करायचा आदेश देशील. तेव्हा तुझे लोक तू निवडलेल्या या नगराकडे आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या मंदिराकडे वळतील. आणि ते तुझ्याकडे प्रार्थना करतील. तेव्हा तू आपल्या स्वर्गातून त्यांची प्रार्थना विंनती ऐक आणि त्यांना मदत कर. जर लोकांच्या हातून तुझ्याविरूद्ध काही पाप घडले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) अशावेळी त्यांच्यावर संतापून तू त्यांचा शत्रूकडून पराभव करवशील. शत्रू मग त्यांना कैदी करून दूरदेशी नेतील. तर बंदी करून नेलेल्या देशात गेल्यावर मग हे लोक झाल्या गोष्टी विचारात घेतील. त्यांना आपल्या पापांचा पश्चाताप करतील तुझ्याकडून दयेची अपेक्षा करतील आणि ते प्रार्थना करतील, आम्ही चुकलो, आमच्या हातून दुष्टाई घडली अशी ते कबुली देतील. बंदी करून नेलेल्या शत्रुंच्या देशात असताना ते जर अंत:करणपूर्वक तुझ्याकडे वळले आणि तू त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीच्या दिशेने, तू निवडलेल्या या नगराच्या दिशेने आणि तुझ्या सन्मानार्थ मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने त्यांनी प्रार्थना केली तर तू ती आपल्या स्वर्गातील ठिकाणाहून त्यांची प्रार्थना व विनंती ऐक व त्यांस न्याय दे. त्यांच्या सर्व पापांची क्षमा कर. तुझ्याविरुध्द पाप केल्याबद्दल त्यांना क्षमा कर. त्यांच्या शत्रूसमोर त्यांच्या वर दया दाखव, म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील, ते तुझे लोक आहेत हे आठव तू त्यांना मिसरमधून बाहेर आणलेस जसे काही लोखंड वितळविण्याचा तापलेल्या भट्टीतून बाहेर काढले हेच तुझे वतन होत. “तर तुझे डोळे तुझ्या सेवकाच्या विनंतीकडे व तुझ्या या इस्राएल लोकांची प्रार्थना कृपाकरून ऐक, ते तुझा धावा करतील त्यांच्या हाकेला प्रतिसाद दे. प्रभू परमेश्वरा, पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यांमधून निवड करून तू यांना वेगळे केले आहेस. तू तुझे अभिवचन दिले आहेस. त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून मिसरमधून तू आमच्या पूर्वजांना बाहेर नेलेस तेव्हा आपला सेवक मोशे याच्याकडून हे कार्य करवून घेतलेस.”

सामायिक करा
१ राजे 8 वाचा

१ राजे 8:22-53 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले आणि म्हटले: “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’ तर आता, हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीद यांना जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. “पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. ‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंती करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या, व ती ऐकून त्यांना क्षमा करा. “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा. “आपल्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा आपले इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातात आणि जेव्हा ते आपल्याकडे पुन्हा वळतात व आपल्या नावाची थोरवी गाऊन, या मंदिरात आपल्याकडे प्रार्थना व विनंती करतात, तेव्हा स्वर्गातून ऐकून आपल्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश आपण त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे. “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, तेव्हा त्यांची विनंती ऐकून आपले सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा व जो देश आपण आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा. “जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, आणि आपल्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश जाणून प्रार्थना किंवा विनंती केली आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार त्यांना करा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण आपणास त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ आपणच प्रत्येक मानवाचे हृदय जाणणारे आहात), यासाठी की जो देश आपण आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जितका काळ ते राहतील त्यांनी तुमचे भय बाळगावे. “असा कोणी परदेशी जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही परंतु आपल्या नावास्तव लांबच्या देशातून आला; कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान तिथून आपण त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही आपल्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी आपले नाव ओळखावे व आपल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपले भय धरावे व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर आपले नाव आहे. “जेव्हा आपले लोक आपण जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे याहवेहची प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. “जेव्हा ते आपणाविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून आपण त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून त्यांच्या जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’; आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्‍यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे; कारण ते तुमचे लोक आणि तुमचे वतन आहेत, ज्यांना तुम्ही इजिप्त देशातून, त्या लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढले आहे. “तुमचे कान आपल्या सेवकाच्या व आपल्या इस्राएली लोकांच्या विनंतीकडे असावे आणि जेव्हा ते आपल्याकडे आरोळी करतील तेव्हा त्यांचे ऐकावे. कारण हे सार्वभौम याहवेह, आपण जेव्हा आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्यावेळी तुमचा सेवक मोशेद्वारे तुम्ही जसे जाहीर केले, त्यानुसार त्यांना आपले वतन व्हावे म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून तुम्ही त्यांना वेगळे केले आहे.”

सामायिक करा
१ राजे 8 वाचा

१ राजे 8:22-53 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

शलमोनाने इस्राएलाच्या सर्व मंडळीदेखत परमेश्वराच्या वेदीसमोर उभे राहून आकाशाकडे हात पसरले; तो म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, वर आकाशात अथवा खाली पृथ्वीवर तुझ्यासमान कोणी देव नाही; जे तुझे सेवक जिवेभावे तुझ्यासमोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने वर्ततोस; जे वचन तू आपला सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले ते तू पाळले आहेस; जे तू आपल्या मुखाने बोललास ते तू आपल्या हाताने पुरे केले आहेस; अशी आज वस्तुस्थिती आहे. तर आता हे इस्राएलाच्या देवा, परमेश्वरा, तुझा सेवक, माझा बाप दावीद ह्याला तू असे वचन दिले होते की तू माझ्यासमोर वागत आलास त्याप्रमाणेच तुझे वंशज आपली चालचलणूक ठेवण्याची खबरदारी घेतील तर माझ्यासमक्ष इस्राएलाच्या राजासनावर बसणार्‍या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा कधीही खुंटायची नाही; त्याला दिलेले हे वचनही तू पुरे कर. तर आता हे इस्राएलाच्या देवा, तू जे वचन तुझा सेवक, माझा बाप दावीद, ह्याला दिले होते ते प्रतीतीस येऊ दे. देव ह्या भूतलावर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ ह्यांत तुझा समावेश होणे नाही; तर हे मंदिर मी बांधले आहे ह्यात तो कसा व्हावा? तरी हे माझ्या देवा, परमेश्वरा, तुझ्या सेवकाच्या प्रार्थनेकडे, विनंतीकडे लक्ष दे; आज तुझा सेवक तुझा धावा करीत आहे व तुझ्यापुढे प्रार्थना करीत आहे, तिच्याकडे कान दे; माझ्या नामाचा निवास येथे होईल असे ज्या स्थलाविषयी तू म्हटलेस त्या ह्या स्थलाकडे, ह्या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो; जी प्रार्थना तुझा सेवक ह्या स्थानाकडे तोंड करून करीत आहे ती ऐक. तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थलाकडे तोंड करून तुझी विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानी तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर. एखाद्याने आपल्या शेजार्‍याचा अपराध केल्यामुळे त्याला शपथ घ्यायला लावली, आणि ती ह्या मंदिरात तुझ्या वेदीसमोर त्याने घेतली, तर तू स्वर्गलोकातून ती श्रवण कर, आणि त्याप्रमाणे घडवून आण; आपल्या सेवकांचा न्याय करून दुष्टांना दुष्ट ठरव आणि ज्याचे कर्म त्याच्या माथी येऊ दे; निर्दोष्यास निर्दोषी ठरवून त्याच्या निर्दोषतेप्रमाणे त्याला फळ दे. तुझे लोक इस्राएल ह्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे शत्रूंपुढे त्यांचा मोड झाल्यावर ते पुन्हा तुझ्याकडे वळतील आणि तुझ्या नामाचा स्वीकार करून ह्या मंदिरात तुझी प्रार्थना व विनवणी करतील, तेव्हा तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक, तुझे लोक इस्राएल ह्यांच्या पापाची क्षमा कर आणि जो देश तू त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आण. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे आकाशकपाटे बंद झाली आणि पर्जन्यवृष्टी खुंटली असता त्यांनी ह्या स्थानाकडे तोंड करून प्रार्थना केली, तुझ्या नामाचा स्वीकार केला व तू त्यांना दीन केल्यामुळे ते तुझ्याकडे वळले, तर तू स्वर्गलोकातून त्यांचे ऐक. इस्राएल तुझी प्रजा, तुझे सेवक, ह्यांच्या पापांची क्षमा कर, कारण ज्या सन्मार्गाने त्यांनी चालले पाहिजे तो तू त्यांना शिकवत आहेस; हा जो देश तू आपल्या लोकांना वतन करून दिला आहेस त्यावर पर्जन्यवृष्टी कर. ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला, आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस; म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगतील. तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, (कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील त्याप्रमाणे कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल. तुझे लोक तू पाठवशील तिकडे आपल्या शत्रूंशी सामना करण्यासाठी जातील आणि तू निवडलेल्या ह्या नगराकडे व तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, तर तू स्वर्गातून त्यांची ती प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे. त्यांनी तुझ्याविरुद्ध पाप केले, (कारण पाप करत नाही असा कोणीच नाही) व तू त्यामुळे क्रोधाविष्ट होऊन त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना जवळच्या अथवा दूरच्या देशात पाडाव करून नेले, तर ज्या देशात त्यांना पाडाव करून नेले तेथे ते विचार करतील आणि आपल्याला पाडाव करून नेणार्‍या लोकांच्या देशांत तुझ्याकडे वळून तुझी विनवणी करून म्हणतील, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही कुटिलतेने वागलो आहोत, आम्ही दुराचरण केले आहे’; आणि ज्यांनी त्यांना पाडाव करून नेले त्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते तुझ्याकडे जिवेभावे वळून, त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, तू निवडलेल्या नगराकडे, तुझ्या नामासाठी मी बांधलेल्या ह्या मंदिराकडे तोंड करून तुझी प्रार्थना करतील, तेव्हा तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून त्यांची प्रार्थना व विनवणी ऐक व त्यांना न्याय दे; तुझ्या लोकांनी जे पाप तुझ्याविरुद्ध केले असेल व जे काही अपराध तुझ्याविरुद्ध केले असतील त्या सर्वांची त्यांना क्षमा करून, त्यांचा पाडाव करणार्‍यांच्या मनात दया उत्पन्न कर म्हणजे ते त्यांच्यावर दया करतील; कारण, ज्यांना तू मिसर देशातून, लोखंडाच्या भट्टीतून काढले तेच हे तुझे लोक, तुझे वतन होत; तर तुझे नेत्र तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे व तुझ्या इस्राएल लोकांच्या विनवणीकडे उघडे राख; ते तुझा धावा करतील; त्यांच्याकडे कान दे. कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांना मिसर देशातून काढले त्या वेळी तुझा सेवक मोशे ह्याच्या द्वारे तू वचन दिलेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांना वेगळे केले आहेस.”

सामायिक करा
१ राजे 8 वाचा