YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 8:22-53

1 राजे 8:22-53 MRCV

नंतर शलोमोनने इस्राएलच्या सर्व मंडळीदेखत याहवेहच्या वेदीसमोर उभे राहून वर स्वर्गाकडे आपले हात पसरले आणि म्हटले: “हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, वर स्वर्गात किंवा खाली पृथ्वीवर तुमच्यासारखा परमेश्वर नाही; जे आपले सेवक सर्व हृदयाने आपल्या मार्गात चालतात त्यांच्याशी आपण आपल्या प्रीतीच्या कराराची पूर्तता करतात. आपला सेवक, माझे पिता दावीदाला दिलेले अभिवचन आपण पाळले आहे; आपण आपल्या मुखाने अभिवचन दिले आणि स्वहस्ते ते आज पूर्ण केले आहे. “आता हे याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक माझे पिता दावीद यांना आपण जे वचन दिले होते ते आपण पाळावे, आपण म्हटले होते, ‘जसा तू होतास तसेच तुझे वंशज माझ्यासमोर विश्वासूपणे चालण्यास सावधान राहतील, तर इस्राएलच्या राजासनावर बसण्यास तुझे वारस कधीही खुंटणार नाही.’ तर आता, हे इस्राएलच्या परमेश्वरा, आपला सेवक, माझे पिता दावीद यांना जे अभिवचन आपण दिले होते ते प्रतितीस येऊ द्यावे. “पण परमेश्वर खचितच पृथ्वीवर राहतील काय? स्वर्ग, अगदी सर्वोच्च स्वर्गात सुद्धा आपण मावणार नाहीत! मग हे जे मंदिर मी बांधले आहे त्यात आपण कसे मावाल? तरीही हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, आपल्या सेवकाच्या प्रार्थनेकडे व त्याच्या दयेच्या याचनेकडे लक्ष द्यावे. आपला सेवक आपल्याकडे प्रार्थना व धावा करीत आहे त्याकडे कान द्या. ‘माझे नाव या ठिकाणी राहेल’ असे ज्या स्थळाविषयी आपण म्हटले होते, त्या या मंदिराकडे दिवस व रात्र आपली दृष्टी असो; यासाठी की या ठिकाणातून करत असलेली तुमच्या सेवकाची प्रार्थना आपण ऐकावी. आपला सेवक व आपले इस्राएली लोक जेव्हा या ठिकाणातून विनंती करतील, तेव्हा त्यांच्या प्रार्थना ऐका. स्वर्गातून, आपल्या निवासस्थानातून कान द्या, व ती ऐकून त्यांना क्षमा करा. “जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील, तेव्हा स्वर्गातून ऐकून त्याप्रमाणे घडू द्या. आपल्या सेवकांचा न्याय करून दोषी व्यक्तीने केलेल्या कृत्यांनुसार त्यांचे शिर खाली झुकवा व निर्दोष्यास त्यांच्या निर्दोषतेनुसार वागणूक देऊन त्यांना न्याय द्यावा. “आपल्याविरुद्ध पाप केल्यामुळे जेव्हा आपले इस्राएली लोक त्यांच्या शत्रूद्वारे पराभूत केले जातात आणि जेव्हा ते आपल्याकडे पुन्हा वळतात व आपल्या नावाची थोरवी गाऊन, या मंदिरात आपल्याकडे प्रार्थना व विनंती करतात, तेव्हा स्वर्गातून ऐकून आपल्या इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा व जो देश आपण त्यांच्या पूर्वजांना दिला त्यात त्यांना परत आणावे. “आपल्या लोकांनी आपल्याविरुद्ध केलेल्या पापामुळे जेव्हा आकाश बंद होऊन पाऊस पडणार नाही आणि जेव्हा ते या ठिकाणातून प्रार्थना करतील आणि आपल्या नावाची थोरवी गातील आणि आपण त्यांच्यावर आणलेल्या क्लेशामुळे ते आपल्या पापापासून वळतील, तेव्हा त्यांची विनंती ऐकून आपले सेवक, इस्राएली लोकांच्या पापांची क्षमा करा. जीवनाचा योग्य मार्ग त्यांना शिकवा व जो देश आपण आपल्या लोकांना वतन म्हणून दिला त्यावर पाऊस पाठवावा. “जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला, आणि आपल्या इस्राएली लोकांपैकी कोणी त्यांच्या हृदयाला होत असलेले क्लेश जाणून प्रार्थना किंवा विनंती केली आणि त्यांचे हात मंदिराकडे पसरतील; तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून ऐकून त्यांना क्षमा करा व त्यानुसार त्यांना करा; प्रत्येकाच्या सर्व कृत्यांनुसार त्यांच्याशी वागा, कारण आपणास त्यांच्या हृदयाची पारख आहे (कारण केवळ आपणच प्रत्येक मानवाचे हृदय जाणणारे आहात), यासाठी की जो देश आपण आमच्या पूर्वजांना दिला, त्यात जितका काळ ते राहतील त्यांनी तुमचे भय बाळगावे. “असा कोणी परदेशी जो आपल्या इस्राएली लोकांमधील नाही परंतु आपल्या नावास्तव लांबच्या देशातून आला; कारण त्यांनी आपले महान नाव आणि आपला पराक्रमी हात व आपला लांबविलेला बाहू याबद्दल ऐकले; व जेव्हा ते येऊन या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान तिथून आपण त्यांची प्रार्थना ऐकावी. त्या परदेशीयाने जे काही आपल्याकडे मागितले ते आपण त्यांना द्यावे, अशासाठी की पृथ्वीवरील लोकांनी आपले नाव ओळखावे व आपल्या इस्राएली लोकांप्रमाणे आपले भय धरावे व जाणावे की मी बांधलेल्या या घरावर आपले नाव आहे. “जेव्हा आपले लोक आपण जिथे पाठवाल तिथे त्यांच्या शत्रूविरुद्ध युद्धास जातात आणि जेव्हा ते तुम्ही निवडलेल्या नगराकडे आणि तुमच्या नावासाठी मी बांधलेल्या मंदिराकडे याहवेहची प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्गातून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. “जेव्हा ते आपणाविरुद्ध पाप करतील; कारण पाप करीत नाही असा कोणी मनुष्य नाही आणि त्यामुळे रागावून आपण त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले आणि त्यांनी त्यांना गुलाम म्हणून त्यांच्या जवळच्या किंवा दूरच्या देशात कैद करून नेले; आणि ते कैदेत असता त्यांच्या हृदयाचा पालट झाला व पश्चात्ताप करीत कैद करून नेलेल्यांच्या देशात आपल्याकडे असे म्हणत विनंती केली, ‘आम्ही पाप केले आहे, आम्ही विपरीत वागलो आहोत, आम्ही दुष्टतेने वागलो आहोत’; आणि त्यांना कैद करून नेलेल्या त्यांच्या शत्रूंच्या देशात ते जर त्यांच्या संपूर्ण हृदयाने व जिवाने आपणाकडे वळले, आणि त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या देशाकडे, जे शहर आपण निवडले आणि मी आपल्या नावासाठी बांधलेल्या या मंदिराकडे वळून प्रार्थना करतील, तेव्हा स्वर्ग जे आपले निवासस्थान आहे तिथून त्यांची प्रार्थना व विनंती ऐकून त्यांच्यावतीने न्याय करावा. आणि ज्या आपल्या लोकांनी आपणाविरुद्ध पाप केले आहे त्यांना क्षमा करावी. त्यांनी आपणाविरुद्ध केलेल्या सर्व अपराधांची त्यांना क्षमा करा व त्यांना कैद करून नेणार्‍यांनी त्यांच्यावर दया दाखवावी असे आपण करावे; कारण ते तुमचे लोक आणि तुमचे वतन आहेत, ज्यांना तुम्ही इजिप्त देशातून, त्या लोखंडाच्या भट्टीतून बाहेर काढले आहे. “तुमचे कान आपल्या सेवकाच्या व आपल्या इस्राएली लोकांच्या विनंतीकडे असावे आणि जेव्हा ते आपल्याकडे आरोळी करतील तेव्हा त्यांचे ऐकावे. कारण हे सार्वभौम याहवेह, आपण जेव्हा आमच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर काढले त्यावेळी तुमचा सेवक मोशेद्वारे तुम्ही जसे जाहीर केले, त्यानुसार त्यांना आपले वतन व्हावे म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांतून तुम्ही त्यांना वेगळे केले आहे.”

1 राजे 8 वाचा