YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 10:1-9

१ राजे 10:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले. शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही. शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली. ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे. पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य. परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”

सामायिक करा
१ राजे 10 वाचा

१ राजे 10:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनची किर्ती व याहवेहशी असलेले त्याचे नाते याविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली. शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही राजासाठी कठीण नव्हते. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला, त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे झगे, त्याचे प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेले होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली. ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे. परंतु मी येथे येऊन या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत त्यावर मी विश्वास ठेवला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे. तुमचे लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील! याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला इस्राएलच्या राजासनावर ठेवले. इस्राएल प्रीत्यर्थ याहवेहच्या सर्वकाळच्या प्रीतिकरिता न्याय व नीतिमत्व राखून ठेवण्यासाठी त्यांनी तुम्हाला राजा केले आहे.”

सामायिक करा
१ राजे 10 वाचा

१ राजे 10:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली. ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्‍यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत. आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”

सामायिक करा
१ राजे 10 वाचा