YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 10:1-9

1 राजे 10:1-9 IRVMAR

परमेश्वराच्या नावासंबंधाने शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली. नोकरा चाकरांचा मोठा लवाजमा आणि सुवासिक मसाल्याचे पदार्थ, रत्ने, सोनेनाणे अशा बऱ्याच गोष्टी उंटांवर लादून ती यरूशलेमेला आली. शलमोनाला भेटल्यावर तिच्या मनातले सर्वकाही तिने त्यास सांगितले. शलमोन राजाने तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. असा कुठलाच प्रश्न नव्हता की, त्याचे उत्तर त्याने दिले नाही. शलमोनाचे शहाणपण शबाच्या राणीने पाहिले त्याने बांधलेला सुंदर महालही तिने पाहिले. त्याच्या मेजावरचे खाणे, त्याच्या सेवकांचा वावर, शलमोनाच्या कारभाऱ्याची ऊठबस आणि त्यांचे पोषाख, त्याचे प्यालेबरदार त्याने दिलेल्या मेजवान्या आणि परमेश्वराच्या मंदिरात केलेले यज्ञ. हे सर्व शबाच्या राणीने पाहिले आणि ती आश्चर्याने थक्क झाली. ती राजाला म्हणाली, “तुझ्या चातुर्याबद्दल आणि कारभाराबद्दल मी माझ्या देशात बरेच ऐकले होते. ते खरे आहे. पण हे सर्व माझ्या डोळ्यांनी बघेपर्यंत, माझा त्यावर विश्वास बसत नव्हता. आता असे वाटते की ऐकले ते कमीच होते. तुझे ऐश्वर्य आणि बुध्दिमत्ता मला लोकांनी सांगितली त्यापेक्षा जास्तच आहे. तुझे लोक आणि सेवक खरेच फार धन्य आहेत. तुझे सेवक, जे तुझ्यासमोर ऊभे राहून, ज्यांना तुझ्या ज्ञानाचा लाभ होतो ते धन्य. परमेश्वर देव थोर आहे, तुझ्यावर प्रसन्न होऊन त्याने तुला इस्राएलाचा राजा केले आहे. परमेश्वर इस्राएलावर प्रेम करतो म्हणून, नियमशास्त्राचे व न्यायाचे पालन करण्यास त्याने तुला राजा केले आहे.”