१ करिंथ 8:1-13
१ करिंथ 8:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; मूर्तींना वाहिलेल्या गोष्टींविषयी आपल्या सर्वांना ज्ञान आहे, हे आपण जाणतो. ज्ञान फुगवते, पण प्रीती उभारणी करते. आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही. पण कोणी देवावर प्रीती करीत असेल तर त्या मनुष्यास देव ओळखतो. म्हणून आता, मूर्तींना वाहिलेल्या पदार्थांच्या सेवनाविषयी आपण जाणतो की, जगात मूर्ती ही काहीच नाही आणि एकाशिवाय दुसरा देव नाही, कारण स्वर्गात आणि पृथ्वीवर देव म्हणलेले पुष्कळ असले, कारण तसे पुष्कळ दैवत आणि पुष्कळ प्रभू असतील, परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो. पण हे ज्ञान प्रत्येक मनुष्यास असणार नाही कारण मूर्तींविषयी जे विवेक बाळगतात असे कित्येकजण, या घटकेपर्यंत, ते मूर्तीला वाहिलेले नैवेद्य खात आहेत; आणि त्यांचा विवेक दुर्बळ असल्यामुळे अशुद्ध होतो. पण अन्नामुळे देवापुढे आपली योग्यता ठरत नाही, आपण न खाण्याने कमी ठरत नाही किंवा खाण्याने अधिक ठरत नाही. पण तुमचे हे स्वातंत्र्य दुर्बळ असलेल्यास, कोणत्याही प्रकारे, अडखळण होऊ नये म्हणून काळजी घ्या. कारण ज्ञान असलेल्या तुला जर मूर्तीच्या असलेल्या ठिकाणी भोजनास बसलेले कोणी बघितले, तर तो दुर्बळ असल्यास त्याचा विवेक मूर्तींना वाहिलेले पदार्थ खाण्यास तयार होईल ना? आणि ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला अशा दुर्बळ असलेल्या तुझ्या बंधूचा तुझ्या या ज्ञानामुळे नाश होतो. पण तुम्ही जेव्हा अशाप्रकारे बंधूच्या विरूद्ध पाप करून त्यांचा दुर्बळ असलेला विवेक तुम्ही दुखावता, तेव्हा तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही.
१ करिंथ 8:1-13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते. ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही. परंतु जो परमेश्वरावर प्रीती करतो, त्याला परमेश्वर ओळखतात. तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.” कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत, तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो. तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो. परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही. तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा. कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का? म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.
१ करिंथ 8:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी : “आपल्या सर्वांना ज्ञान आहे” हे आपल्याला ठाऊक आहे. “ज्ञान” फुगवते, प्रीती उन्नत्ती करते. जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अद्याप कळत नाही. जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.1 आता मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, “जगात (देवाची) म्हणून मूर्तीच नाही;”2 आणि “एकाखेरीज दुसरा देव नाही.” कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले, आणि अशी बरीच “दैवते” व बरेच “प्रभू” आहेतच, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याच्यापासून अवघे झाले व आपण त्याच्यासाठी आहोत; आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्या द्वारे अवघे झाले व आपण त्याच्या द्वारे आहोत. तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य म्हणून खातात; तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते. देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही, आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. कारण सुज्ञ असा जो तू त्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले, तर तो दुर्बळ असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना? ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाच्या योगे नाश होतो. बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बळ सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. म्हणून अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.
१ करिंथ 8:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आता मूर्तीला दाखवलेल्या नैवेद्यांविषयी तुम्ही जे लिहिले होते, त्याच्याकडे मी वळतो. आपल्या सर्वांना ज्ञान आहे, असे म्हटले जाते, हे खरे आहे. असे ज्ञान अहंकार निर्माण करते परंतु प्रीती प्रगती साधत असते. जर कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते, तर ज्याप्रमाणे कळले पाहिजे, त्याप्रमाणे त्याला त्याचे आकलन झालेले नसते. मात्र जो देवावर प्रीती करतो, त्याला देव ओळखतो. मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने आपल्याला ठाऊक आहे की, जे खरोखर अस्तित्वात नाही त्याचे प्रतिनिधित्व मूर्ती करीत असते आणि एकाखेरीज दुसरा देव नाही. ज्यांना देव म्हणून मानतात अशी स्वर्गात किंवा पृथ्वीवर बरीच दैवते व बरेच प्रभू असतील, तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे, त्याने सर्व काही निर्माण केले व आपण त्याच्यासाठी जगतो आणि आपला एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झाले व आपण त्याच्या कृपेने जगतो. तथापि हे ज्ञान सर्वांना असते असे नाही, तर कित्येकांवर मूर्तीपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेले खाद्य नैवेद्य म्हणून खातात, तेव्हा त्यांची सदसद्विवेकबुद्धी दुर्बल असल्यामुळे ती विटाळते. देवापुढे आपली योग्यायोग्यता अन्नाने ठरत नाही; न खाण्याने आपण कमी होत नाही आणि खाण्याने आपण अधिक होत नाही. मात्र हे तुमचे स्वातंत्र्य दुर्बळास अडथळ्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. जाणकार असलेल्या तुला मूर्तीच्या देवळात जेवायला बसलेले कोणी पाहिले व तो पाहणारा दुर्बल असल्यास, मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाण्यास त्याच्या सदसद्विवेकबुद्धीला चालना मिळेल ना? ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला, असा जो दुर्बल बंधू, त्याचा तुझ्या ह्या ज्ञानाने नाश होईल. बंधूंविरुद्ध असे पाप करून व त्यांच्या दुर्बल सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. म्हणून अन्नामुळे माझा बंधू पापात पडत असेल, तर तो पापात पडू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.