1 करिंथकरांस 8
8
मूर्तींना वाहिलेले अन्न
1मूर्तींना अर्पण केलेले अन्न: आपल्याला माहीत आहे “आपल्या सर्वांना ज्ञान आहे.” ज्ञान फुगविते, परंतु प्रीती वृद्धी करते. 2ज्यांना वाटत असेल की आपण ज्ञानी आहोत, तर जे त्यांना समजावयास पाहिजे ते त्यांना अजूनही समजले नाही. 3परंतु जो परमेश्वरावर प्रीती करतो, त्याला परमेश्वर ओळखतात.
4तर आता, मूर्तीना अर्पण केलेले अन्न यासंबंधी आपल्याला माहीत आहे, “या जगातील मूर्तीमध्ये परमेश्वराचे अस्तित्व नाही” आणि “एका परमेश्वराशिवाय दुसरा परमेश्वर नाही.” 5कारण स्वर्गात आणि पृथ्वीवरही जरी तथाकथित परमेश्वर आणि अनेक “देवता” आणि अनेक “प्रभू” आहेत, 6तरी आपल्याला एकच परमेश्वर, पिता ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि त्यांच्यासाठी आम्ही जगतो; आणि एकच प्रभू, येशू ख्रिस्त ज्यांच्याद्वारे सर्वकाही निर्माण झाले आणि ज्यांच्याद्वारे आपण जगतो.
7तरी हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही; कित्येक लोकांवर मूर्तीचा प्रभाव अजूनही असल्यामुळे जेव्हा ते मूर्तीला अर्पिलेले अन्न सेवन करतात, तेव्हा ते परमेश्वराला अर्पिलेले आहे असे समजून खातात, त्यांचा विवेक दुर्बल असल्यामुळे विटाळतो. 8परंतु अन्न आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेत नाही; जर आपण खात नाही तर आपली हानी होत नाही आणि जर खातो तर काही अधिक चांगले होत नाही.
9तरी तुमच्या या अधिकाराचा उपयोग करीत असताना जे दुर्बल आहेत त्यांना अडखळण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगा. 10कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का? 11म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये. 12जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. 13यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.
सध्या निवडलेले:
1 करिंथकरांस 8: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.