सफन्याह 1
1
1सफन्याहला, जो कूशीचा पुत्र, जो गदल्याहचा पुत्र, जो अमर्याहचा पुत्र, जो हिज्कीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा योशीयाह, जो आमोनचा पुत्र होता, याच्या कारकिर्दीत याहवेहकडून आलेले वचन ते असे:
याहवेहचा संपूर्ण पृथ्वीसाठी न्यायाचा दिवस
2“मी पृथ्वीतलावरून सर्वकाही
झटकून नाहीसे करेन.”
असे याहवेह जाहीर करतात.
3“मी माणसे आणि जनावरे दोन्हीही नष्ट करेन;
मी आकाशातील पक्षी नष्ट करेन
आणि समुद्रातील मासेही—
त्या मूर्ती ज्या दुष्टाच्या अडखळण्याचे कारण बनते.”
याहवेह जाहीर करतात,
“जेव्हा मी पृथ्वीवरून
सर्व मानवजातीला नष्ट करेन,
4तेव्हा मी यहूदीयातील
आणि यरुशलेम येथील सर्व रहिवाशांच्या विरुद्ध माझा हात उगारेन.
या ठिकाणावरील बआलच्या सर्व शेष उपासकांचा मी नाश करेन
प्रत्येक मूर्तिपूजक पुजार्यांच्या नावाचा—
5जे त्यांच्या घरांच्या धाब्यांवर जातात
आणि आकाशातील नक्षत्रांना नमन करतात.
जे याहवेहला नमन करून त्यांची शपथ घेतात,
आणि मोलेख#1:5 किंवा मालकम दैवताचीही शपथ घेतात,
6जे याहवेहचे अनुसरण करण्यापासून मागे फिरले आहेत
आणि जे याहवेहचा शोध घेत नाहीत वा त्यांची इच्छा जाणून घेत नाहीत.”
7सार्वभौम याहवेहपुढे स्तब्ध राहा.
कारण त्यांच्या न्यायाचा दिवस जवळ आला आहे;
याहवेहने अर्पण सिद्ध केले आहे;
ज्यांना त्यांनी आमंत्रित केले, त्यांचे पवित्रीकरण केले आहे.
8याहवेहच्या अर्पणाच्या दिवशी
मी अधिपतींना आणि राजपुत्रांना
आणि परकीय वस्त्रे परिधान करणार्या
सर्वांना शिक्षा करेन.
9त्या दिवशी या सर्वांना शिक्षा करेन
जे उंबरठ्यावर पाऊल ठेवण्याचे टाळतात#1:9 1 शमु 5:5 पाहावे
जे त्यांच्या दैवतांची मंदिरे
हिंसाचार व लबाडीने भरतात.
10याहवेह जाहीर करतात,
“त्या दिवशी मत्स्य वेशीपासून
एक मोठी आरोळी ऐकू जाईल,
नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी,
आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;
11विलाप करा, तुम्ही जे मक्तेशातील व्यापारी भागात राहता,
तुमचे सर्व व्यापारी,
सोन्याचांदीचा व्यवहार करणारे सर्वजण नष्ट होतील.
12त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन
आणि जे बेफिकीर असतात,
जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत,
जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट
असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.
13या लोकांची मालमत्ता लुटली जाईल,
यांचीच घरे ढासाळून टाकली जातील,
जरी त्यांनी घरे बांधली असतील,
त्या घरात ते राहू शकणार नाहीत;
जरी त्यांनी द्राक्षमळा लावला असेल,
द्राक्षांचा रस ते पिणार नाहीत.”
14याहवेहचा तो भयावह दिवस जवळ—
तो वेगाने अगदी जवळ येत आहे.
याहवेहच्या दिवसाची गर्जना मर्मभेदक आहे;
सामर्थ्यशाली योद्धे त्याची रणगर्जना करतील.
15तो दिवस क्रोधाग्नीचा दिवस असेल—
तो दिवस दुःखाचा व क्लेशाचा,
तो दिवस अरिष्ट व उजाडतेचा,
तो दिवस अंधकाराचा व उदासीनतेचा,
तो दिवस अभ्रांचा व निबिड काळोखाचा—
16तो दिवस तटबंदीच्या नगरांविरुद्ध
आणि कोपऱ्यातील बुरुजा विरुद्ध
रणशिंगाचा व रणगर्जनांच्या निनादांचा असेल.
17“मी सर्व लोकांवर अशा विपत्ती आणेन, ते मार्ग शोधणार्या
एखाद्या आंधळ्या माणसाप्रमाणे चाचपडतील,
कारण त्यांनी याहवेहविरुद्ध पाप केले आहे.
त्यांचे रक्त धुळीसारखे ओतले जाईल
व त्यांच्या आतड्या शेणासारख्या विखुरतील.
18त्यांचे सोने किंवा त्यांची चांदी
त्यांना याहवेहच्या क्रोधापासून
वाचवू शकणार नाही.”
त्यांच्या ईर्षेच्या अग्नीने
संपूर्ण पृथ्वी भस्म होईल,
कारण जे सर्व पृथ्वीवर रहिवास करतात
त्यांचा ते अकस्मातपणे अंत करतील.
सध्या निवडलेले:
सफन्याह 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.