प्रकटीकरण 14
14
कोकरा आणि 1,44,000
1नंतर सीयोन पर्वतावर एक कोकरा उभा असलेला मी पाहिला. ज्यांच्या कपाळावर त्यांचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिले होते, असे 1,44,000 लोक त्याच्याबरोबर होते. 2मग मी स्वर्गातून तो मोठ्या धबधब्याच्या गर्जनेसारखा आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटासारखा एक ध्वनी ऐकला. तो अनेक वीणावादक आपआपल्या वीणा वाजवित असल्यासारखा होता. 3लोकांचा हा अतिभव्य गायकवृंद परमेश्वराचे राजासन, चार सजीव प्राणी व चोवीस वडीलजन यांच्यासमोर एक नवे गीत गात होता. पृथ्वीवरून खंडणी भरून सोडविलेल्या या 1,44,000 लोकांशिवाय दुसर्या कोणालाही हे गाणे शिकता येत नव्हते. 4कारण त्यांनी स्वतःला शुद्ध राखलेले आहे आणि स्त्रीसंगाने ते मलीन झालेले नाहीत. जिथे कुठे कोकरा जातो, तिथे ते त्याच्यामागे जातात. त्यांना माणसातून विकत घेण्यात आले होते आणि परमेश्वराला व कोकर्याला प्रथमफळ म्हणून अर्पण केले होते. 5असत्य भाषण कधीही त्यांच्या मुखातून निघाले नाही; ते निष्कलंक आहेत.
तीन स्वर्गदूत
6नंतर मी अंतराळाच्या मध्यभागी दुसरा एक देवदूत उडतांना पाहिला. पृथ्वीवर राहणार्या सर्वांना, म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोकांना सांगण्यासाठी तो सर्वकालची शुभवार्ता घेऊन चालला होता. 7तो मोठ्या आवाजात म्हणाला, “परमेश्वराचे भय धरा व त्यांना गौरव द्या! कारण त्यांनी न्यायनिवाडा करावा अशी वेळ आता आली आहे. ज्यांनी आकाश, पृथ्वी, समुद्र आणि पाण्याचे झरे निर्माण केले, त्यांची उपासना करा.”
8तेव्हा त्याच्या पाठोपाठ दुसरा एक देवदूत आला. तो म्हणत होता, “ ‘पडले! महान बाबिलोन शहर पडले!’#14:8 यश 21:9 ज्या शहराने सर्व राष्ट्रांना आपल्या व्यभिचाराचे वेड लावणारे द्राक्षमद्य पाजले, ते पडले.”
9मग त्यांच्यामागून एक तिसरा देवदूत मोठ्याने घोषणा करीत आला: “समुद्रातील पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला जो कोणी नमन करेल आणि त्याचे चिन्ह आपल्या कपाळावर किंवा हातावर गोंदून घेईल, 10त्या प्रत्येकाला परमेश्वराच्या क्रोधाचा द्राक्षमद्याचा प्याला, त्याची तीव्रता कमी न करता प्यावा लागेल. पवित्र देवदूत व कोकरा यांच्यासमक्ष या सर्वांचा जळत्या गंधकाने छळ करण्यात येईल. 11त्यांच्या छळाचा धूर युगानुयुग वर चढत राहील आणि त्यातून त्यांची रात्री किंवा दिवसा कधीच सुटका होत नाही. कारण त्यांनी त्या पहिल्या पशूला व त्याच्या मूर्तीला नमन केले, आणि त्याच्या नावाची सांकेतिक खूण गोंदून घेतली. 12कारण येशूंवर विश्वास ठेवणारे व अखेरपर्यंत परमेश्वराच्या आज्ञा पाळणार्या पवित्र लोकांना यामुळे धीराने प्रत्येक छळ सहन करण्याची आता आवश्यकता आहे.”
13मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभूमध्ये मृत झालेले ते धन्य.”
आत्मा म्हणतो, “होय, कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”
पृथ्वीवर कापणी आणि द्राक्षकुंड तुडविणे
14मग मी पाहिले तो मला एक पांढरा मेघ दिसला, त्या मेघावर मनुष्याच्या पुत्रासारखे कोणी एक बसले होते. त्यांच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व हातात धारदार विळा होता. 15मग मंदिरातून एक देवदूत बाहेर आला व मेघावर बसलेल्यास उच्चस्वराने हाक मारून म्हणाला, “तुमचा विळा घ्या आणि कापणीस प्रारंभ करा, कारण पृथ्वीचे पीक तयार झाले आहे व कापणी करण्याची वेळ आली आहे.” 16तेव्हा मेघावर बसलेल्याने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली.
17यानंतर स्वर्गातील मंदिरातून आणखी एक देवदूत निघाला आणि त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. 18दुसरा एक देवदूत ज्याला अग्नीवर अधिकार होता तो वेदीतून बाहेर आला आणि विळा घेतलेल्या देवदूताला मोठ्याने म्हणाला, “पृथ्वीवरील द्राक्षवेलींना लागलेले द्राक्षांचे घोस, विळा चालवून कापून घे. कारण ते पिकले आहेत.” 19तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर आपला विळा चालविला आणि द्राक्षे गोळा करून, रस काढण्यासाठी ती परमेश्वराच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकली. 20ते द्राक्षकुंड शहराबाहेर तुडविण्यात आले, तेव्हा त्यातून रक्ताचा पाट वाहिला. हा पाट घोड्यांच्या लगामा एवढा उंच आणि तीनशे किलोमीटर लांब होता.
सध्या निवडलेले:
प्रकटीकरण 14: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.