फिलिप्पैकरांस 2
2
ख्रिस्ताच्या नम्रतेचे अनुकरण
1यास्तव ख्रिस्ताच्या ठायी ऐक्यता असल्यामुळे काही उत्तेजन, त्यांच्या प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, जर काही करुणा व कळवळा आहे, 2तर तुम्ही एकमेकांशी सहमत होणारे, सारखीच प्रीती करणारे आणि एका आत्म्याचे व एकमनाचे होऊन माझा आनंद परिपूर्ण करा. 3स्वार्थी महत्त्वाकांक्षा, किंवा बढाई मारण्याच्या हेतूंनी तुम्ही काहीही करू नये, तर प्रत्येकाने नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानावे. 4तुम्ही केवळ स्वतःचेच हित नव्हे, तर इतरांचेही हित पाहावे.
5ख्रिस्त येशूंमध्ये जी मनोवृत्ती होती, तीच वृत्ती तुम्ही एकमेकांच्या संबंधात बाळगा:
6ते खुद्द परमेश्वराच्या स्वरुपाचे असूनही
त्यांनी स्वतःस परमेश्वरासमान केले नाही
व परमेश्वरासम असण्याचा लाभ त्यांनी घेतला नाही;
7उलट, त्यांनी स्वतःला रिक्त केले
आणि दासाचे स्वरूप घेऊन,
मनुष्यांच्या प्रतिरूपाचे झाले.
8मानवी रूप धारण करून
त्यांनी स्वतःस लीन केले,
येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास,
आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
9म्हणून परमेश्वराने त्यांना अत्युच्च स्थानी ठेवले
आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्यांना दिले;
10यासाठी की येशूंच्या नावाने प्रत्येक गुडघा टेकला जावा,
स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली,
11परमेश्वर पित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीभ कबूल करेल
की येशू ख्रिस्त हेच प्रभू आहेत.
सर्वकाही कुरकुर न करता करा
12यास्तव, प्रिय मित्रांनो, मी तिथे तुम्हाबरोबर असताना आणि याहीपेक्षा माझ्या अनुपस्थितीत तुम्ही नेहमीच आज्ञापालन केले आहे, म्हणून तुमच्या तारणाचे कार्य भयात व कापत साधून घ्या. 13कारण परमेश्वर आहेत, की ज्यांनी आपल्या उत्तम योजनेसाठी तुमच्यामध्ये इच्छा करणे व कृती करणे साधले आहे.
14जे काही कराल ते सर्व कुरकुर व वादविवाद न करता करा, 15म्हणजे, “तुम्ही या दुष्ट आणि कुटिल आणि हेकेखोर पिढीत दोषरहित व शुद्ध राहून परमेश्वराची लेकरे”#2:15 अनु 32:5 म्हणून त्यांच्यामध्ये आकाशातील तार्यांप्रमाणे चमकाल. 16तुम्ही जीवनाचे वचन मजबूत धरून ठेवले आहे म्हणून ख्रिस्ताच्या दिवशी माझी धाव व श्रम व्यर्थ झाले नाही याचा मला अभिमान बाळगता येईल. 17तुमच्या विश्वासाची सेवा आणि यज्ञ यावर मी स्वतः पेयार्पण म्हणून अर्पण केला जात आहे तरी मीही तुमच्याबरोबर आनंद करेन. 18त्याचप्रमाणे तुम्हीही उल्हासित व्हावे आणि माझ्याबरोबर आनंद करावा.
तीमथ्य व एपफ्रदीत
19मला प्रभू येशूंमध्ये आशा आहे की, मी लवकरच तीमथ्याला तुमच्याकडे पाठवेन; म्हणजे तुमची बातमी ऐकून मीही उल्हासित होईन. 20तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही. 21इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. 22शुभवार्तेच्या कार्यात तीमथ्याने मला जसा पुत्र आपल्या पित्यास करतो, तसे साहाय्य करून स्वतःस सिद्ध केले हे तुम्हाला माहीत आहे. 23माझ्या सर्वगोष्टी व्यवस्थित होताच, त्याला तुमच्याकडे लवकर पाठविता येईल अशी मला आशा आहे; 24आणि मीही स्वतः लवकर येईन, असा प्रभूवर माझा भरवसा आहे.
25मध्यंतरी मला वाटले की मी एपफ्रदीत हा माझा भाऊ, सहकारी, सहसैनिक आणि तुमचा संदेशवाहक याला तुमच्याकडे परत पाठवावे. माझ्या गरजेच्यावेळी मला साहाय्य करण्यासाठी तुम्ही त्याला पाठविले होते. 26कारण त्याच्या आजाराची वार्ता तुम्ही ऐकली म्हणून तुम्हा सर्वांना भेटावयास तो उत्सुक व चिंताक्रांत झालेला आहे; 27आणि खरोखरच तो आजारी पडला, अंदाजे मरणोन्मुख झाला होता, पण परमेश्वराने त्याच्यावर आणि माझ्यावरही दया करून मला दुःखावर दुःख होण्यापासून वाचविले. 28म्हणूनच त्याला तुमच्याकडे परत पाठविण्यास मी अधिकच उत्सुक आहे. कारण त्याला पाहून तुम्हाला आनंद वाटेल आणि माझी चिंताही कमी होईल. 29प्रभूमध्ये मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत करून त्याच्यासारख्यांचा सत्कार करा. 30कारण ख्रिस्ताच्या सेवेसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला व त्याला अंदाजे मरण आलेच होते, माझ्यासाठी तुम्हाला ज्यागोष्टी करता आल्या नाहीत त्या त्याने केल्या.
सध्या निवडलेले:
फिलिप्पैकरांस 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.