YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:1-25

मार्क 10:1-25 MRCV

येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले. काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.” येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.” लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. येशू वाटेला लागणार तोच, एक मनुष्य त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून त्यांना म्हणाला, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ” “गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.” येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!” हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे. श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”