YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 10:1-25

मार्क 10:1-25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

नंतर येशूने ती जागा सोडली आणि यहूदीया प्रांतात व यार्देन ओलांडून पलीकडे गेला. लोक समुदाय एकत्र जमून त्याच्याकडे आले आणि आपल्या चालीप्रमाणे त्याने त्यांना शिकविले. काही परूशी येशूकडे आले. त्यांनी त्यास विचारले, “पतीने पत्नी सोडावी हे कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले. येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.” येशू म्हणाला, “केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना नर व नारी असे निर्माण केले. या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.” नंतर येशू व शिष्य घरात असता, शिष्यांनी या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.” मग त्याने बालकांस हात ठेवावा? करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही.” तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. येशू प्रवासास निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे?” येशू त्यास म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणी एक उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.” तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.” येशूने त्याच्याकडे पाहिले त्यास त्याच्यावर प्रीती केली तो त्यास म्हणाला, “तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझ्याजवळ जे असेल नसेल ते सर्व विक आणि गोरगरीबांस देऊन टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल आणि मग चल, माझ्यामागे ये.” हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.” त्याचे शब्द ऐकून शिष्य थक्क झाले, परंतु येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे! श्रीमंतांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

सामायिक करा
मार्क 10 वाचा

मार्क 10:1-25 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू कफर्णहूम प्रांत सोडून यार्देनेच्या यहूदीया प्रांतात आले. त्यांच्यामागे लोकांची गर्दी होती आणि रीतीप्रमाणे त्यांना त्यांनी शिक्षण दिले. काही परूशी आले आणि त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना विचारले, “एखाद्या मनुष्याने त्याच्या पत्नीला घटस्फोट देणे नियमानुसार आहे काय?” त्यांनी उत्तर दिले, “मोशेने तुम्हाला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.” येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. परंतु सृष्टीच्या प्रारंभापासूनच परमेश्वराने त्यांना ‘पुरुष व स्त्री.’ असे निर्माण केले. ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, आणि ते दोघे एकदेह होतील.’ म्हणून येथून पुढे ते दोघे नसून एकदेह आहेत. म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.” नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.” लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. जेव्हा येशूंनी पाहिले, तेव्हा ते रागावले व म्हणाले, “लहान बालकांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना प्रतिबंध करू नका, कारण परमेश्वराचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” नंतर त्यांनी बालकांना कवेत घेतले, त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला. येशू वाटेला लागणार तोच, एक मनुष्य त्यांच्याकडे धावत आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून त्यांना म्हणाला, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय करावे?” येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत: ‘तू खून करू नको, तू व्यभिचार करू नको, तू चोरी करू नको, तू खोटी साक्ष देऊ नको, तू फसवू नको, तुझ्या आईवडिलांचा मान राख.’ ” “गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.” येशूंनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्यावर प्रीती केली. “तू एका गोष्टीत उणा आहेस,” तो म्हणाला. जा, “तुझे आहे ते सर्वकाही विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.” यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!” हे ऐकून त्यांच्या बोलण्याचे शिष्यांना आश्चर्य वाटले. मग येशू पुन्हा म्हणाले, “मुलांनो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी अवघड आहे. श्रीमंत मनुष्याला परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

सामायिक करा
मार्क 10 वाचा

मार्क 10:1-25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग तो तेथून निघून यहूदीया प्रांतात व यार्देनेच्या पलीकडे गेला; तेव्हा पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले; आणि पुन्हा तो आपल्या परिपाठाप्रमाणे त्यांना शिकवू लागला. परूशी तेथे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले की, “पुरुषाने बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; परंतु उत्पत्तीच्या प्रारंभापासून ‘देवाने त्यांना स्त्रीपुरुष असे उत्पन्न केले.’ ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ ती पुढे दोन नव्हत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये.” नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो; आणि जर तिने आपल्या नवर्‍याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.” मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणार्‍यांना दटावले. ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, “बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.” तेव्हा त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा ठाऊकच आहेत; ‘खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, ठकवू नकोस, आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राख.”’ त्याने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.” येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर त्याने प्रीती केली. तो त्याला म्हणाला, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल, [वधस्तंभ घेऊन] माझ्यामागे ये.” परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!” तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले; येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “मुलांनो, [जे संपत्तीवर भरवसा ठेवतात त्यांना] देवाच्या राज्यात प्रवेश करणे कितीतरी कठीण आहे! धनवानाला देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे.”

सामायिक करा
मार्क 10 वाचा

मार्क 10:1-25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू तेथून निघून यहुदिया प्रांतात जाऊन यार्देन नदीच्या पलीकडे पोहोचला. पुन्हा लोक घोळक्यांनी त्याच्याकडे आले आणि नेहमीप्रमाणे तो त्यांना प्रबोधन करू लागला. काही परुशी त्याच्याकडे आले आणि त्याची परीक्षा पाहण्याच्या उद्देशाने त्यांनी त्याला विचारले, “पतीने पत्नीला सूटपत्र देणे धर्मशास्त्राला धरून आहे काय?” उत्तरादाखल तो म्हणाला, “मोशेने तुम्हांला कोणती आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली. परंतु निर्मितीच्या प्रारंभापासून देवाने त्यांना स्त्री व पुरुष असे उत्पन्न केले. ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एकदेह होतील. ती पुढे दोन नव्हेत तर एकदेह आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने विभक्त करू नये.’” घरी परतल्यावर त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.” येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले. ते पाहून येशूला राग आला. तो त्यांना म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचे आहे. मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला तेथे मुळीच प्रवेश मिळणार नाही.” त्याने त्यांना कवटाळून व त्यांच्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला. तो बाहेर पडून रस्त्याने पुढे गेल्यावर एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याला विचारले, “गुरुवर्य, आपण किती चांगले आहात! शाश्वत जीवनाचे वतन मिळवता यावे म्हणून मी काय केले पाहिजे?” येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. तुला आज्ञा ठाऊक आहेत:खून करू नकोस; व्यभिचार करू नकोस; चोरी करू नकोस; खोटी साक्ष देऊ नकोस; फसवू नकोस; आपले वडील व आपली आई ह्यांचा मान राख.” त्याने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.” येशूने त्याच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने पाहिले व त्याला म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. जा, तुझे जे काही असेल ते विकून जे मिळेल ते गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. नंतर येऊन माझा शिष्य हो.” परंतु हे शब्द ऐकून त्याचा चेहरा उतरला व खिन्न होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!” शिष्य त्याच्या बोलण्याने थक्क झाले. तरीही येशू त्यांना पुढे म्हणाला, “माझ्या मुलांनो, देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे! धनवानाने देवाच्या राज्यात जाणे ह्यापेक्षा, उंटाने सुईच्या नेढ्यातून जाणे सोपे आहे.”

सामायिक करा
मार्क 10 वाचा