याकोब 5
5
जुलूम करणार्या श्रीमंतांना इशारा
1श्रीमंत लोकांनो, ऐका, जी आपत्ती तुमच्यावर येणार आहे त्यामुळे रडा आणि विलाप करा. 2तुमची संपत्ती सडली आहे व तुमच्या वस्त्रांना गंज लागला आहे. 3तुमचे सोने आणि चांदी याला गंज चढला आहे. त्यांचे गंजणे तुम्हाविरुद्ध साक्ष देईल आणि अग्नीप्रमाणे तुमचे मांस खाऊन टाकेल. शेवटच्या दिवसासाठी तुम्ही धनाचा साठा करून ठेवला आहे. 4पाहा! ज्या कामकर्यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे. 5पृथ्वीवर तुम्ही विलासात आणि भोगासक्तीत राहिला. तुम्ही स्वतःला वधासाठी#5:5 किंवा सणाच्या दिवसासाठी धष्टपुष्ट केले आहे. 6जो तुमचा विरोध करत नव्हता, त्या निष्पाप मनुष्याला तुम्ही दोषी ठरवून त्याचा वध केला.
दुःखसहनात सोशिकपणा
7प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूचे आगमन होईपर्यंत धीर धरा. पाहा शेतकरी कसा जमिनीतून निघणार्या मोलवान पिकांची वाट पाहतो. शरद आणि वसंतामध्ये येणार्या पावसाची धीराने वाट पाहतो. 8तसेच तुम्ही पण, धीर धरा आणि खंबीरपणे उभे राहा, कारण प्रभूचे येणे जवळ आले आहे. 9बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा न्याय होऊ नये म्हणून एकमेकांविरुद्ध कुरकुर करू नका. न्यायाधीश दारात उभा आहे.
10बंधूंनो आणि भगिनींनो, संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलत असताना त्यांनी सहन केलेले दुःख आणि धीर याचे उदाहरण लक्षात घ्या. 11तुम्हाला माहीत आहे, ज्यांनी धीर धरला त्यांना आपण आशीर्वादित म्हणतो. तुम्ही इय्योबाच्या धीराविषयी ऐकले आणि शेवटी प्रभूने त्याला कसे आशीर्वादित केले हे तुम्ही पाहिले. प्रभू करुणा आणि दया यांनी भरलेले आहेत.
12या सर्वांपेक्षा, माझ्या बंधू आणि भगिनींनो, ना स्वर्गाची, ना पृथ्वीची किंवा दुसर्या कोणत्याच गोष्टींची शपथ वाहू नका. जे काही तुम्हाला म्हणावयाचे ते साधे “होय” किंवा “नाही” असावे. नाही तर तुम्ही दोषी ठरविले जाल.
विश्वासाची प्रार्थना
13तुम्हापैकी कोणी त्रासात आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्यांनी स्तुतिस्तोत्रे गावीत. 14तुम्हामध्ये कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तैलाभ्यंग करावा आणि प्रार्थना करावी. 15विश्वासाने केलेली प्रार्थना त्या रोग्याला बरे करेल; प्रभू त्याला उठवेल. जर त्यांनी पाप केले असेल, तर त्यांची क्षमा होईल. 16यास्तव एकमेकांजवळ आपली पापे कबूल करा व एकमेकांसाठी प्रार्थना करा, म्हणजे तुम्ही निरोगी व्हाल. नीतिमान माणसाची प्रार्थना प्रबळ व परिणामकारक असते.
17एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही. 18मग त्याने पुन्हा प्रार्थना केली, तेव्हा आकाशातून पाऊस पडला आणि पृथ्वीने आपला उपज दिला.
19प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जर तुम्हातील कोणी एक सत्यापासून बहकला असेल आणि अशा व्यक्तीला कोणी परत आणेल तर मग 20हे लक्षात ठेवा, जो कोणी अशा पापी व्यक्तीला त्याच्या अयोग्य मार्गापासून फिरवितो, तो त्याला मरणापासून वाचवेल आणि त्याच्या अनेक पापांवर पांघरूण घालेल.
सध्या निवडलेले:
याकोब 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.