2 इतिहास 5
5
1याहवेहच्या मंदिराचे सर्व काम शलोमोन राजाने पूर्ण केल्यानंतर, त्याने त्याचा पिता दावीदाने समर्पित केलेल्या वस्तू मंदिरात आणल्या; चांदी, सोने आणि इतर सामान—शलोमोनाने त्या वस्तू परमेश्वराच्या मंदिराच्या भांडार्यात ठेवल्या.
कोश मंदिरात आणतात
2तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले. 3आणि इस्राएलचे सर्व लोक सातव्या महिन्यातील सणाच्या काळात राजाकडे एकत्र आले.
4जेव्हा इस्राएलचे सर्व वडीलजन आले तेव्हा लेवी लोकांनी कोश उचलून घेतला, 5आणि त्यांनी कोश, सभामंडप व त्यातील सर्व पवित्र पात्रे आणली. याजकीय लेव्यांनी ती वाहून आणली, 6राजा शलोमोन आणि जमलेली इस्राएलची संपूर्ण मंडळी कोशासमोर इतक्या मेंढरांचे आणि गुरांचे बळी देत होते की, त्यांची नोंद किंवा मोजणी करता येत नव्हती.
7नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या निर्धारित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला. 8करुबांचे पंख कोशावर असे पसरले होते की त्यांनी कोश आणि तो वाहून नेण्याचे दांडे झाकले जात होते. 9ते दांडे इतके लांब होते की, त्यांची कोशालगत असलेली टोके आतील खोलीसमोरील पवित्रस्थानातून दिसत असे, परंतु पवित्रस्थानाच्या बाहेरून ते दिसत नसे; आणि ते आजही तिथेच आहेत. 10इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर आल्यानंतर याहवेहने त्यांच्याशी करार केला तेव्हा होरेबमध्ये मोशेने ठेवलेल्या दोन पाट्यांशिवाय त्या कोशात दुसरे काहीही नव्हते.
11त्यानंतर याजक पवित्रस्थानापासून मागे निघाले. तिथे असलेल्या सर्व याजकांनी त्यांच्या वर्गाकडे लक्ष न देता स्वतःस पवित्र करून घेतले होते. 12सर्व लेवीय जे संगीतकार होते—आसाफ, हेमान, यदूथून आणि त्यांचे पुत्र आणि नातेवाईक—वेदीच्या पूर्व बाजूला उत्तम तागाची वस्त्रे घातलेले आणि झांजा, सारंग्या आणि वीणा वाजवित एकशेवीस याजक उभे राहिले. 13रणशिंग वाजविणारे आणि संगीतकार याहवेहस्तव एकसुरात स्तुतिगान आणि आभारप्रदर्शन करण्यासाठी सहभागी झाले. कर्णे, झांजा आणि इतर वाद्यांसहित गायकांनी याहवेहची स्तुती करण्यासाठी त्यांचा आवाज उंचाविला व ते गाईले:
“ते चांगले आहेत;
त्यांचे प्रेम सर्वकाळ टिकते.”
तेव्हा याहवेहचे मंदिर मेघांनी भरून गेले, 14आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते.
सध्या निवडलेले:
2 इतिहास 5: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.