1 इतिहास 18
18
दावीदाची यशोगाथा
1काही काळानंतर, दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्यावर ताबा घेतला आणि गथ व त्याच्या सभोवतालची गावे पलिष्ट्यांच्या ताब्यातून काढून घेतली.
2दावीदाने मोआबी लोकांचा सुद्धा पराभव केला आणि ते त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले.
3याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची उभारणी करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने#18:3 किंवा आपली सत्ता स्थापित करावयास सोबाहचा राजा हादादेजर याचा हमाथाच्या परिसरात पराभव केला. 4दावीदाने त्याचे एक हजार रथ, सात हजार रथस्वार आणि वीस हजार पायदळ ताब्यात घेतले. परंतु रथाच्या घोड्यांपैकी शंभर घोडे सोडून बाकी घोड्यांच्या नसा कापून टाकल्या.
5जेव्हा दिमिष्कातील अरामी लोक सोबाहचा राजा हादादेजरच्या मदतीला आले तेव्हा दावीदाने त्यांच्यातील बावीस हजार जणांना ठार केले. 6नंतर त्याने दिमिष्कातील अरामी राज्यात ठाणे बसविले आणि अरामी लोक त्याच्या अधीन झाले आणि त्याला कर देऊ लागले. दावीद जिथेही गेला, तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
7हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या. 8हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ#18:8 किंवा तेबाह व कून येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. शलोमोनाने हे नंतर वितळविले व मंदिर बांधण्याच्या कामात कास्याची मोठी टाकी, खांब आणि वेदीवरील यज्ञार्पणांसाठी लागणारी उपकरणे बनविण्याच्या उपयोगात आणले.
9हमाथाचा राजा तोऊ याने जेव्हा ऐकले की, दावीदाने सोबाहचा राजा हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, 10तेव्हा त्याने आपला पुत्र हादोरामला दावीदाला आशीर्वाद देऊन अभिनंदन करण्यासाठी दावीद राजाकडे पाठवले, कारण दावीदाने हादादेजरशी युद्ध करून त्याच्यावर विजय मिळविला होता. कारण हादादेजर आणि तोऊ#18:10 इतर मूळ प्रतींनुसार तोई यांच्यातही युद्ध होते. हदोरामने त्याच्याबरोबर चांदी, सोने आणि कास्याच्या सर्वप्रकारच्या वस्तू आणल्या.
11दावीद राजाने या वस्तू, या सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही: एदोम आणि मोआब, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी.
12जेरुइयाहचा पुत्र अबीशाईने क्षार खोर्यात एदोमाचे अठरा हजार लोक ठार मारले. 13त्याने एदोमात ठाणे बसविले, आणि सर्व एदोमी लोक दावीदाच्या अधीन झाले. दावीद जिथेही गेला तिथे याहवेहने त्याला विजय दिला.
दावीदाचे अधिकारी
14दावीदाने संपूर्ण इस्राएलवर राज्य केले व त्याच्या लोकांशी तो न्यायाने व सत्याने वागत असे.
15जेरुइयाहचा पुत्र योआब सर्व सैन्याचा सेनापती होता;
आणि अहीलुदचा पुत्र यहोशाफाट नोंदणी करणारा.
16अहीतूबचा पुत्र सादोक आणि अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख#18:16 इतर मूळ प्रतींनुसार अबीमेलेख याजक;
शावेशा राजाचा चिटणीस होता.
17यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी आणि पेलेथी लोकांवर अधिकारी होता.
दावीदाचे पुत्र राजाचे मुख्य मंत्री होते.
सध्या निवडलेले:
1 इतिहास 18: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.