मार्क 6:21-44
मार्क 6:21-44 MACLBSI
शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली. तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.” तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.” राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला. शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला. प्रेषित येशूजवळ परत आले व त्यांनी जे काही केले व शिकवले, ते सर्व त्याला सांगितले. तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायलादेखील सवड होईना म्हणून तो त्यांना म्हणाला, “चला, आपण एकान्त ठिकाणी जाऊ या, म्हणजे तेथे तुम्हांला थोडा विसावा घेता येईल.” तेंव्हा ते मचव्यातून एकान्त स्थळी गेले. पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.” त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले, येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. भोजन घेणाऱ्या पुरुषांची संख्या पाच हजार होती.

