मार्क 6:21-44
मार्क 6:21-44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले. यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले. नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती. तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले. परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले. येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते.
मार्क 6:21-44 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
अखेर योग्य समय आला. हेरोदाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने आपल्या दरबारातील मुख्य अधिकारी आणि लष्करातील सेनापती तसेच गालील प्रांतातील प्रमुख नागरिकांना मोठी मेजवानी दिली. त्या समारंभात हेरोदियेची कन्या आत आली व नृत्य करून तिने हेरोदाला संतुष्ट केले आणि त्याचबरोबर मेजवानीसाठी आलेल्या इतर पाहुणे मंडळीलाही खुश केले. हेरोद राजाने मुलीला म्हटले, “तुला हवे असेल ते माग आणि ते मी तुला देईन.” शपथ घेऊन व वचन देऊन तो तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्याइतके जे काही तू मला मागशील, ते मी तुला देईन.” ती बाहेर गेली आणि आपल्या आईला विचारले, “मी काय मागू?” आईने सल्ला दिला, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर माग.” घाईघाईने ती मुलगी राजाकडे परत आली आणि त्याला म्हणाली, “मला बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिर तबकात घालून आता हवे आहे.” तेव्हा राजा अतिशय अस्वस्थ झाला, पण आपल्या शपथेमुळे आणि भोजनाला आलेल्या पाहुण्यांमुळे तिला नकार देणे त्याला बरे वाटले नाही. शेवटी राजाने आपल्या एका शिरच्छेद करणार्याला तुरुंगात पाठवून योहानाचे शिर आणण्याची आज्ञा केली. त्या मनुष्याने योहानाचा तुरुंगात शिरच्छेद केला, आणि त्याचे शिर तबकात घालून त्या मुलीला दिले व तिने ते आपल्या आईला दिले. ही घटना ऐकल्यानंतर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शव घेतले आणि कबरेत ठेवले. नंतर प्रेषित येशूंभोवती गोळा झाले आणि आपण काय केले व काय शिकविले यासंबंधीचा सर्व वृत्तांत त्यांनी सांगितला. नंतर येशूंनी सुचविले, “तुम्ही माझ्याबरोबर या, आपण शांत ठिकाणी जाऊ आणि थोडा विसावा घेऊ.” कारण इतके लोक येजा करीत होते की, त्यांना जेवण करण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्याप्रमाणे होडीत बसून ते एकांतस्थळी गेले. अनेकांनी त्यांना जाताना पाहिले व त्यांना ओळखले. तेव्हा नगरातील लोक त्यांच्याकडे पायी आले आणि त्यांच्या आधी तिथे पोहोचले. जेव्हा येशू होडीतून उतरले आणि त्यांनी मोठा समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. येशूंनी त्यांना पुष्कळ गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली. दिवस मावळण्याच्या सुमारास, त्यांचे शिष्य त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, “ही ओसाड जागा आहे, शिवाय उशीरही होत चालला आहे. या लोकांना आसपासच्या गावात जाऊन खाण्यासाठी अन्न विकत घ्यावे म्हणून निरोप द्या.” यावर येशू म्हणाले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.” त्यांनी विचारले, “इतक्या लोकांना जेवू घालावयाचे म्हणजे अर्ध्या वर्षाच्या मजुरी पेक्षा अधिक रक्कम खर्च करावी काय?” ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले. त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले. ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले, आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या. तिथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
मार्क 6:21-44 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर एक सोईचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालीलातील प्रमुख लोक ह्यांना मेजवानी दिली. आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदाला व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांना खूश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर!” तेव्हा लगेचच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, “माझी इच्छा अशी आहे की, बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे.” तेव्हा राजा फारच खिन्न झाला; तथापि वाहिलेल्या शपथांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. राजाने लगेच आपल्या पहार्यातील एका शिपायाला पाठवून योहानाचे शीर आणण्याची आज्ञा केली; त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला, आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकल्यावर त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून कबरेत नेऊन ठेवले. ह्यानंतर प्रेषित येशूजवळ जमा झाले व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व त्यांनी त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकान्तात चला व थोडा विसावा घ्या;” कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवण्यासदेखील सवड होईना. तेव्हा ते मचव्यातून पलीकडे रानात एकान्तात गेले. लोकांनी त्यांना निघताना पाहिले व पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले; आणि तेथल्या सर्व गावांतून लोक पायीच निघाले व धावत जाऊन त्यांच्याअगोदर तिकडे पोहचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे; तेव्हा लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या. [कारण त्यांच्याजवळ खायला काही नाही.”] त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन दोनशे रुपयांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला द्याव्यात?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, व दोन मासे.” नंतर त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. तेव्हा ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. मग त्याने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या त्यांना वाढण्यास आपल्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. मग सर्व जण जेवून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे [सुमारे] पाच हजार पुरुष होते.
मार्क 6:21-44 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शेवटी हेरोदियाला एक संधी मिळाली. हेरोदने त्याच्या वाढदिवशी त्याचे सरकारी प्रधान, सैन्यातील सरदार व गालीलमधील प्रमुख नागरिक ह्यांना मेजवानी दिली. तेव्हा हेरोदियाच्या मुलीने स्वतः तेथे येऊन नृत्य करून हेरोद व त्याच्याबरोबर भोजनाला बसलेले पाहुणे ह्यांना खूष केले. त्या वेळी राजा त्या मुलीला म्हणाला, “तुला जे काही पाहिजे, ते माझ्याजवळ माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन.” तिने बाहेर जाऊन तिच्या आईला विचारले, “मी काय मागू?” ती म्हणाली, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर.” तिने लगेच घाईघाईने राजाकडे येऊन म्हटले, “बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचे शिर तबकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावे, अशी माझी इच्छा आहे.” राजा फारच खिन्न झाला. तरी पण वाहिलेल्या शपथेमुळे व भोजनाला बसलेल्या पाहुण्यांमुळे त्याला नाही म्हणवेना. राजाने लगेच त्याच्या रक्षकांतील एका शिपायास पाठवून योहानचे शिर आणण्याचा आदेश दिला. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला. शिर तबकात घालून ते मुलीला देण्यात आले व मुलीने ते तिच्या आईला दिले. हे ऐकल्यावर योहानचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह उचलून कबरीत नेऊन ठेवला. प्रेषित येशूजवळ परत आले व त्यांनी जे काही केले व शिकवले, ते सर्व त्याला सांगितले. तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यांना जेवायलादेखील सवड होईना म्हणून तो त्यांना म्हणाला, “चला, आपण एकान्त ठिकाणी जाऊ या, म्हणजे तेथे तुम्हांला थोडा विसावा घेता येईल.” तेंव्हा ते मचव्यातून एकान्त स्थळी गेले. पुष्कळ लोकांनी त्यांना निघताना पाहिले व लगेच त्यांना ओळखले. तेथल्या सर्व नगरांतून लोक त्वरेने पायीच निघाले व त्यांच्या आधी तिकडे पोहोचले. येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा विशाल समुदाय पाहिला. ते तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यांना बऱ्याच गोष्टींविषयी प्रबोधन करू लागला. दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व आता दिवस मावळत आहे. लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यांत जाऊन स्वतःकरता खायला काही विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “काय, आम्ही जाऊन चांदीच्या दोनशे नाण्यांच्या भाकरी विकत घेऊन त्यांना खायला देऊ?” तो त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पाहा.” पाहिल्यावर ते म्हणाले, “पाच, शिवाय दोन मासे.” त्याने त्या सर्व लोकांना हिरवळीवर गटागटाने बसायला सांगितले. ते शंभरशंभर व पन्नासपन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले, येशूने त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन स्वर्गाकडे पाहून परमेश्वराचे आभार मानले आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढायला त्याच्या शिष्यांजवळ दिल्या. ते दोन मासेही सर्वांना वाटून दिले. सर्व जण जेवून तृप्त झाले. त्यानंतर त्यांनी भाकरीच्या व माशांच्या उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. भोजन घेणाऱ्या पुरुषांची संख्या पाच हजार होती.