YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 15:1-16

ईयोब 15:1-16 MARVBSI

मग अलीफज तेमानी म्हणाला, “सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्‍याने भरील काय? निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय? तू तर देवाचे भय सोडले आहेस; तू देवचिंतनाचा संकोच करतोस. तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते. तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे, मी नाही; तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे. पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय? देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहेस काय? आम्हांला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हांला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे? पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत. देवाने केलेले सांत्वन आणि तुझ्याशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय? तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस? तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस? मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार? पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही. तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!