उत्पत्ती 47:13-31
उत्पत्ती 47:13-31 MARVBSI
त्या समयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले. मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला. मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही, तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हांला अन्न द्या. आपल्यादेखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा सर्व पैसा संपला.” योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.” तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली, त्यांचे घोडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांना तो अन्न पुरवू लागला; त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यांना अन्न देऊन त्यांचे पोषण केले. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामींपासून लपवत नाही; आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत; आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी ह्यांखेरीज आमच्याजवळ काहीएक राहिले नाही; आपल्यादेखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हांला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हांला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी होवो; आम्हांला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत. ह्या प्रकारे योसेफाने मिसरातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिसर्याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली. त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना दास1 केले. मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकांना फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही. मग योसेफ लोकांना म्हणाला, “आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हांला फारोच्या नावे विकत घेतले आहे; हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोला द्यावा; बाकीचे चार हिस्से तुमच्या मालकीचे होतील; ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हांला, तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी ठेवा.” ते म्हणाले, “आपण आमचे प्राण वाचवले, स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू.” फारोला उत्पन्नाचा पाचवा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला तो आजवर चालत आहे; मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. इस्राएल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले; तेथे त्यांनी वतने केली; ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले. याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले. इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा; मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात ठेव.” तो म्हणाला, “आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, “माझ्याशी शपथ वाहा”; तेव्हा त्याने शपथ वाहिली; आणि इस्राएलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले.

