YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 47:13-31

उत्पत्ती 47:13-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

त्या वेळी सर्व भूमीवर दुष्काळ तर फारच कडक पडला होता; अन्नधान्य कोठेच मिळत नव्हते. त्यामुळे मिसर व कनान देशातील जमीन दुष्काळामुळे उजाड झाली. योसेफाने मिसर आणि कनान देशातील रहिवाशांना अन्नधान्य विकून त्यांच्याकडील सर्व पैसा गोळा केला. त्यानंतर योसेफाने तो पैसा फारोच्या राजवाड्यात आणला. काही काळाने मिसर व कनान देशातील लोकांचे पैसे संपून गेले, त्यामुळे मिसरचे लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हास अन्न द्या! आमचे सर्व पैसे संपले आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोरच का मरावे?” परंतु योसेफ म्हणाला, “जर तुमचे पैसे संपले आहेत, तर तुम्ही मला तुमची गुरेढोरे द्या आणि मग मी तुमच्या गुराढोरांच्या बदल्यात तुम्हास धान्य देईन.” तेव्हा लोकांनी त्यांच्याकडील गुरेढोरे, शेरडेमेंढरे, घोडे, गाढवे आणि इतर जनावरे देऊन अन्नधान्य विकत घेतले. त्या वर्षात लोकांकडून गुरेढोरे घेऊन त्यांच्या बदल्यात योसेफाने त्यांना अन्नधान्य दिले. परंतु त्या वर्षानंतर, पुढील वर्षी लोक योसेफाकडे जाऊन म्हणाले, “आमच्या धन्यापासून आम्ही काही लपवत नाही. आपणास माहीत आहे की, आमच्याकडे पैसे उरलेले नाहीत आणि आमची गुरेढोरेही धन्याची झाली आहेत. तेव्हा आमच्या धनाच्यासमोर आमची शरीरे व आमच्या जमिनी याशिवाय दुसरे काहीही उरलेले नाही. तुमच्या डोळ्यांसमोर आम्ही का मरावे? आमचा व आमच्या जमिनीचाही नाश का व्हावा? परंतु जर आपण आम्हांला अन्नधान्य द्याल तर मग आम्ही आमच्या जमिनी फारोला देऊ आणि आम्ही त्याचे गुलाम होऊ. आम्हास बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि जमिनी ओस पडणार नाहीत.” तेव्हा मिसरमधील सर्व शेतजमिनी योसेफाने फारोसाठी विकत घेतल्या. मिसरी लोकांनी आपल्या शेतजमिनी फारोला विकल्या कारण दुष्काळ भयंकर तीव्र झाला होता. मिसरमधील एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांस त्याने फारोचे गुलाम केले. योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी मात्र विकत घेतल्या नाहीत. फारो याजकांना त्यांच्या कामाबद्दल पगार देत होता. त्या पैशातून ते आपणासाठी अन्नधान्य विकत घेत असत म्हणून त्यांच्यावर आपल्या जमिनी विकण्याची वेळ आली नाही. तेव्हा योसेफ लोकांस म्हणाला, “पाहा, मी फारोकरता तुम्हास तुमच्या जमिनीसह विकत घेतले आहे तर मी आता तुम्हास बियाणे देतो. ते तुम्ही शेतात पेरा. परंतु हंगामाच्या वेळी तुमच्या उत्पन्नातील पाचवा हिस्सा फारोला दिलाच पाहिजे. बाकीचे चार हिस्से तुम्ही तुमच्यासाठी घ्यावेत. त्यातून पुढच्या वर्षाकरता तुम्ही बियाणे ठेवावे व बाकीच्या धान्याचा तुमच्या घरातील लहानथोरांस खाण्यासाठी उपयोग करावा.” लोक म्हणाले, “आपण आम्हांला वाचवले आहे, म्हणून फारोचे गुलाम होण्यात आम्हांला आनंद आहे.” त्या वेळी मग योसेफाने देशासाठी एक कायदा केला, तो आजपर्यंत चालू आहे; त्या कायद्याप्रमाणे जमिनीच्या उत्पन्नाचा पाचवा भाग फारोचा आहे. फारो मिसरमधील सर्व जमिनीचा मालक आहे. फक्त याजकांची जमीन फारोच्या मालकीची नाही. इस्राएल मिसरमध्ये गोशेन प्रांतात राहिला. त्याची संतती खूप वाढली व त्यांची भरभराट झाली. त्यांना मिसरमधील जमीन मिळाली व त्यांनी वतने केली आणि तेथे त्यांचे सर्वकाही चांगले झाले. याकोब मिसरमध्ये सतरा वर्षे राहिला, तो एकशे सत्तेचाळीस वर्षांचा झाला. इस्राएलाच्या मरणाचा काळ जवळ आला, म्हणून मग त्याने आपला मुलगा योसेफ याला आपणाजवळ बोलावले आणि तो त्यास म्हणाला, “तू जर माझ्यावर प्रेम करतोस तर माझ्या मांडीखाली तुझा हात ठेवून मला वचन दे की, मी जे सांगतो ते तू करशील आणि तू माझ्याशी खरेपणाने वागशील. मला मिसरामध्ये पुरू नको. जेव्हा मी माझ्या वाडवडिलांसोबत झोपी जाईन, तेव्हा मला मिसरमधून बाहेर घेऊन जा आणि माझ्या पूर्वजांना जेथे पुरले आहे तेथे म्हणजे आपल्या वंशजांसाठी घेतलेल्या पुरण्याच्या जागेत मला मूठमाती दे.” योसेफाने उत्तर दिले, “तुम्ही मला जे करावयास सांगितले ते मी नक्की करीन.” मग याकोब म्हणाला, “तू माझ्याशी तशी शपथ वाहा.” तेव्हा तसे करण्याबद्दल योसेफाने शपथ वाहिली. मग इस्राएलाने आपले डोके मागे पलंगाच्या उशावर नम्रतेने खाली वाकून नमन केले.

सामायिक करा
उत्पत्ती 47 वाचा

उत्पत्ती 47:13-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

मात्र, दुष्काळ उग्र असल्याने संपूर्ण प्रदेशात अन्न नव्हते; दुष्काळामुळे इजिप्त आणि कनान दोन्ही देश कष्टमय झाले. योसेफाने धान्य विकून इजिप्त आणि कनानमधील सर्व पैसा गोळा केला आणि त्याने तो पैसा फारोहच्या महालात आणला. जेव्हा इजिप्त आणि कनानी लोकांजवळचा सर्व पैसा संपला तेव्हा इजिप्तमधील लोक योसेफाकडे आले आणि म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला आहे तरी आम्हाला अन्न द्या. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का?” यावर योसेफाने उत्तर दिले, “तुमचे पैसे संपले आहेत, तर मग तुमची गुरे मला द्या आणि त्यांच्या मोबदल्यात मी तुम्हाला अन्नधान्य देतो.” त्याप्रमाणे अन्नधान्यासाठी लोकांनी आपले सर्व घोडे, गुरे, शेरडेमेंढरे आणि गाढवे योसेफाकडे आणली आणि त्याने त्याच्या मोबदल्यात त्यांना वर्षभर पुरेल इतके धान्य दिले. ते वर्ष संपल्यावर, पुढच्या वर्षी ते त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “आम्ही धन्यापासून हे सत्य लपवू शकत नाही की आमचा पैसा संपला आणि आमची गुरे तुमची झाली आहेत आणि आता आमच्याजवळ आमच्या धन्यासाठी फक्त आमची शरीरे व आमच्या जमिनी राहिल्या आहेत. आम्ही तुमच्या नजरेसमोर अन्नावाचून मरावे का? आता आम्हाला आमच्या जमिनीसह विकत घ्या म्हणजे आम्ही फारोहचे गुलाम होऊ. अन्नासाठी आम्ही स्वतःचा विक्रय केला तरच आम्ही जगू आणि जमिनीही मोकळ्या राहणार नाहीत.” याप्रमाणे योसेफाने इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहसाठी विकत घेतली. दुष्काळ महाभयंकर असल्यामुळे सर्व इजिप्त देशातील लोकांनी त्याला आपआपली शेते विकली आणि इजिप्त देशातील सर्व जमीन फारोहची झाली, तसेच योसेफाने इजिप्त देशातील एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतच्या शहरातील सर्व लोकांना गुलाम बनविले. याजकांच्या जमिनी मात्र योसेफाने विकत घेतल्या नाहीत, कारण फारोहकडून त्यांना निर्धारित अन्नधान्य पुरविले जात असे आणि त्यामुळे त्यांनी जमिनी विकल्या नाही. मग योसेफ लोकांना म्हणाला, “पाहा, मी फारोहसाठी तुम्हाला तुमच्या जमिनींसह विकत घेतले आहे. आता हे बियाणे घ्या आणि जमिनीत पेरा. ज्यावेळी तुम्ही कापणी कराल. त्यावेळी तुमच्या उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोहला द्यावा. राहिलेले चार हिस्से पुढील वर्षाच्या बियाण्यांसाठी आणि तुम्हासाठी, तुमचे कुटुंब व मुलाबाळांच्या खाण्यासाठी ठेवा.” लोक म्हणाले, “तुम्ही आमचे प्राण वाचविले आहेत, आमच्या धन्याच्या दृष्टीत आम्हाला दया प्राप्त होवो; आम्ही फारोहच्या गुलामगिरीत राहू.” म्हणून योसेफाने याजकांच्या मालकीच्या जमिनी शिवाय इतर सर्व जमिनीतील पिकांचा पाचवा हिस्सा फारोहला देण्यात यावा, असा इजिप्त देशभर कायदा केला. हा कायदा आजवर चालू आहे. अशा रीतीने इस्राएली इजिप्तच्या गोशेन प्रांतात राहू लागले, आणि त्यांनी तिथे जमीनजुमला संपादन केला व ते फलद्रूप होऊन संख्येने खूप वाढले. इजिप्त देशात याकोब सतरा वर्षे जगला आणि त्याच्या जीवनाची वर्षे एकशे सत्तेचाळीस होती. इस्राएलाची मृत्युघटका भरत आली त्यावेळी त्याने आपला पुत्र योसेफ याला बोलाविले आणि म्हटले, “जर तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्या मांडीखाली हात ठेऊन अशी शपथ घे की तू मला करुणेने व विश्वासाने वागवशील. इजिप्त देशात मला मूठमाती देऊ नकोस, परंतु जेव्हा मी माझ्या पूर्वजांसोबत झोपी जाईन, मला इजिप्तमधून बाहेर ने आणि त्यांना जिथे पुरले आहे, तिथे मला मूठमाती दे.” त्याने म्हटले, “तुम्ही जसे सांगितले आहे तसेच मी करेन.” “मला शपथ दे.” त्याने म्हटले, मग योसेफाने त्याला शपथ दिली आणि मग इस्राएलने आपल्या काठीच्या टोकावर टेकून उपासना केली.

सामायिक करा
उत्पत्ती 47 वाचा

उत्पत्ती 47:13-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

त्या समयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले. मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला. मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही, तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हांला अन्न द्या. आपल्यादेखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा सर्व पैसा संपला.” योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.” तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली, त्यांचे घोडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांना तो अन्न पुरवू लागला; त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यांना अन्न देऊन त्यांचे पोषण केले. ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामींपासून लपवत नाही; आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत; आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी ह्यांखेरीज आमच्याजवळ काहीएक राहिले नाही; आपल्यादेखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हांला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हांला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी होवो; आम्हांला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत. ह्या प्रकारे योसेफाने मिसरातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिसर्‍याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली. त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना दास1 केले. मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकांना फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही. मग योसेफ लोकांना म्हणाला, “आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हांला फारोच्या नावे विकत घेतले आहे; हे बियाणे घ्या व जमिनी पेरा. तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोला द्यावा; बाकीचे चार हिस्से तुमच्या मालकीचे होतील; ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हांला, तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी ठेवा.” ते म्हणाले, “आपण आमचे प्राण वाचवले, स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू.” फारोला उत्पन्नाचा पाचवा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला तो आजवर चालत आहे; मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत. इस्राएल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले; तेथे त्यांनी वतने केली; ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले. याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले. इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा; मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात ठेव.” तो म्हणाला, “आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन. तो म्हणाला, “माझ्याशी शपथ वाहा”; तेव्हा त्याने शपथ वाहिली; आणि इस्राएलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले.

सामायिक करा
उत्पत्ती 47 वाचा