१ शमुवेल 19:1-7
१ शमुवेल 19:1-7 MARVBSI
शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते. म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.” योनाथानाने आपला बाप शौल ह्याच्याकडे दाविदाची प्रशंसा करून म्हटले की, “राजाने आपला दास दावीद ह्याच्याविरुद्ध अपराध करू नये. कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्त सांडण्याचे पाप का करता?” शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले; त्याने आणभाक करून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जिवे मारायचे नाही.” योनाथानाने दाविदाला बोलावून आणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या; मग योनाथानाने दाविदाला शौलाकडे नेले; आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला.

