१ शमुवेल 19:1-7
१ शमुवेल 19:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती. योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा. मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.” तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत. त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?” तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.” मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला.
१ शमुवेल 19:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
शौलाने त्याचा पुत्र योनाथान आणि सर्व सेवकांना सांगितले की त्यांनी दावीदाला मारून टाकावे. परंतु योनाथानला दावीद फार आवडत असे म्हणून त्याने दावीदाला सावध केले, “माझा पिता शौल तुला मारण्याची संधी शोधत आहे. तर उद्या सकाळपर्यंत तू सावध राहा; गुप्त ठिकाणी जा व तिथेच लपून राहा. तू जिथे आहेस तिथे बाहेर मैदानात माझ्या पित्याबरोबर मी उभा राहीन; त्याच्याशी मी तुझ्याविषयी बोलेन आणि जे मला समजेल ते मी तुला कळवेन.” योनाथान त्याचा पिता शौल याच्याशी दावीदाबद्दल चांगले बोलत म्हणाला, “राजाने त्यांचा सेवक दावीद याचे काही वाईट करू नये; त्याने तुमचे काही वाईट केले नाही आणि त्याने जे काही केले त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला आहे. त्याने त्याचा जीव मुठीत घेऊन त्या पलिष्ट्याला मारले. याहवेहने सर्व इस्राएलसाठी मोठा विजय मिळवून दिला आणि तुम्हाला ते पाहून आनंद झाला होता. तर मग दावीदासारख्या निर्दोष व्यक्तीला विनाकारण मारून तुम्ही पाप का करावे?” शौलाने योनाथानचे बोलणे ऐकले आणि शपथ घेतली: “खचितच जिवंत याहवेहची शपथ, दावीदाला जिवे मारले जाणार नाही.” तेव्हा योनाथानने दावीदाला बोलाविले आणि झालेले सर्व संभाषण त्याला सांगितले. त्याने त्याला शौलाकडे नेले आणि नेहमीप्रमाणे दावीद शौलापुढे राहिला.
१ शमुवेल 19:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शौलाने आपला पुत्र योनाथान व आपले सर्व सेवक ह्यांना सांगून ठेवले की दाविदाला मारून टाकावे; पण शौलाचा पुत्र योनाथान ह्याचे दाविदावर फारच मन बसले होते. म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा. ज्या मैदानात तू असशील तेथे जाऊन मी आपल्या बापासमोर हजर होईन व त्याच्याकडे तुझी गोष्ट काढीन; मला काही कमीजास्त दिसले तर मी ते तुला कळवीन.” योनाथानाने आपला बाप शौल ह्याच्याकडे दाविदाची प्रशंसा करून म्हटले की, “राजाने आपला दास दावीद ह्याच्याविरुद्ध अपराध करू नये. कारण त्याने आपला काही अपराध केला नाही, उलट त्याची सर्व कामे आपल्या हिताची झाली आहेत. कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्त सांडण्याचे पाप का करता?” शौलाने योनाथानाचे म्हणणे मान्य केले; त्याने आणभाक करून म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याला जिवे मारायचे नाही.” योनाथानाने दाविदाला बोलावून आणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या; मग योनाथानाने दाविदाला शौलाकडे नेले; आणि तो पूर्वीप्रमाणे शौलाच्या तैनातीस राहिला.