मत्तय 25
25
दहा कु मारिकांचा दाखला
1स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल. त्या त्यांचे दिवे घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या. 2त्यांत पाच मूर्ख व पाच शहाण्या होत्या. 3मूर्ख कुमारिकांनी त्यांचे दिवे घेतले पण त्यांच्याबरोबर तेल घेतले नाही. 4शहाण्यांनी त्यांचे दिवे घेतले व भांड्यांत तेलही घेतले. 5वराला विलंब लागला व सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली.
6मध्यरात्री हाक आली, “पाहा, वर आला आहे. त्याला सामोऱ्या जा.’ 7त्या सर्व मुली उठून आपापले दिवे नीट करू लागल्या. 8मूर्खांनी शहाण्यांना म्हटले, “तुम्ही आम्हांला तुमच्या तेलातून थोडेसे द्या कारण आमचे दिवे मालवू लागले आहेत.’ 9शहाण्यांनी उत्तर दिले, “नाही. आम्हांला व तुम्हांला पुरेल एवढे तेल आमच्याकडे नाही. तुम्ही स्वतःकरता तेल विकत घेऊन या.’ 10त्या तेल विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर लग्नास गेल्या आणि दार बंद झाले.
11नंतर त्या दुसऱ्या कुमारिकादेखील येऊन म्हणाल्या, “महाशय, आमच्यासाठी दार उघडा.’ 12त्याने उत्तर दिले, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मी तुम्हांला ओळखत नाही.’
13तुम्ही जागृत राहा कारण तुम्हांला तो दिवस किंवा ती घटका ठाऊक नाही.
तीन दासांचा दाखला
14स्वर्गाचे राज्य असे असेल: परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने त्याच्या दासांना बोलावून त्यांच्याकडे त्याची मालमत्ता सोपवून दिली. 15एकाला त्याने पाच हजार सुवर्ण मोहरा, दुसऱ्याला दोन हजार मोहरा तर तिसऱ्याला एक हजार मोहरा अशा ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे दिल्या आणि तो परदेशी गेला. 16ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या त्याने लगेच जाऊन त्यांच्यावर व्यापार केला व आणखी पाच हजार कमावल्या. 17तसेच ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या त्यानेही आणखी दोन हजार मिळवल्या, 18परंतु ज्याला एक हजार मिळाल्या होत्या त्याने जाऊन जमीन खणली व तिच्यात त्याच्या धन्याचा पैसा लपवून ठेवला.
19बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी परत आला व त्यांच्याकडून हिशोब घेऊ लागला. 20ज्याला पाच हजार मोहरा मिळाल्या होत्या तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे पाच हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी पाच हजार मिळवल्या आहेत.’ 21त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास. मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
22त्यानंतर ज्याला दोन हजार मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्याकडे दोन हजार मोहरा सोपवून दिल्या होत्या, पाहा, त्यांच्यावर मी आणखी दोन हजार मिळविल्या आहेत.’ 23त्यालाही त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोड्या गोष्टींत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू तुझ्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’
24ज्याला एक हजार मोहरा मिळाल्या होत्या तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर आहात. जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता. 25म्हणून मी भ्यालो व जाऊन तुमच्या हजार मोहरा मी जमिनीत लपवून ठेवल्या होत्या. जे तुमचे आहे ते तुम्हांला परत करत आहे.’
26त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापणी करतो व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो, हे तुला ठाऊक होते ना? 27तर मग माझे पैसे सावकाराकडे ठेवायचे होते म्हणजे मी आल्यावर ते मला व्याजासकट परत मिळाले असते.’ 28तो त्याच्या दासांना म्हणाला, “त्या हजार मोहरा त्याच्याकडून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या. 29कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल आणि ज्या कोणाकडे नाही त्याच्याजवळ जे असेल तेदेखील त्याच्याकडून काढून घेतले जाईल 30आणि हे बघा, ह्या निरुपयोगी दासाला बाहेरील अंधारात टाका. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.’
न्यायाचा दिवस
31जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो स्वतःच्या राजासनावर बसेल. 32त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि मेंढपाळ जसे शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळी करील. 33नीतिमान लोकांना तो त्याच्या उजवीकडे व इतरांना डावीकडे ठेवील. 34मग राजा त्याच्या उजवीकडच्यांना म्हणेल, “अहो, माझ्या पित्याचा आशीर्वाद लाभलेल्या लोकांनो, या. जे राज्य जगाच्या निर्मितीपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. 35कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले; तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले; परका होतो, तेव्हा मला घरात घेतले; 36उघडा होतो, तेव्हा मला वस्त्र दिले; आजारी होतो, तेव्हा माझी काळजी घेतली; तुरुंगात होतो, तेव्हा तुम्ही मला भेटायला आलात.’
37त्या वेळी नीतिमान त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही कधी तुम्हांला खायला दिले? केव्हा तुम्हांला प्यायला दिले? 38केव्हा तुम्हांला परके पाहून घरात घेतले? आणि केव्हा तुम्हांला उघडे पाहून वस्त्र दिले? 39तुमच्या कोणत्या आजारपणात आम्ही काळजी घेतली? आणि कोणत्या तुरुंगात आम्ही तुम्हांला भेटायला आलो?’ 40राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, ज्याअर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले, त्याअर्थी ते माझ्यासाठी केले.’
41त्यानंतर डावीकडच्यांनाही तो म्हणेल, “अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघून सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो अनंत अग्नी सिद्ध केला आहे, त्यात जा. 42कारण मी भुकेला होतो, तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो, तेव्हा मला प्यायला दिले नाही. 43परका होतो, तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही; आजारी व तुरुंगात होतो, तेव्हा माझ्या भेटीला आला नाही.’
44त्या वेळेस तेदेखील त्याला विचारतील, “प्रभो, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी, किंवा तुरुंगात पाहिले आणि तुम्हांला साहाय्य केले नाही?’ 45तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला खरोखर सांगतो, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकाला साहाय्य करायचे तुम्ही नाकारले, त्याअर्थी तुम्ही मला साहाय्य करायचे नाकारले.’ 46तर मग ह्यांना अनंत शिक्षा भोगायला पाठवले जाईल आणि नीतिमान शाश्वत जीवन उपभोगायला जातील.”
Voafantina amin'izao fotoana izao:
मत्तय 25: MACLBSI
Asongadina
Hizara
Mampitaha
Dika mitovy
Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.