प्रेषितांचे कार्य 24

24
फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशी
1पाच दिवसांनंतर उच्च याजक हनन्या, काही वडीलजन आणि तिर्तुल्‍ल नावाचा एक वकील ह्यांना घेऊन तेथे आला. त्यांनी राज्यपालांपुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. 2त्याला बोलावल्यावर तिर्तुल्‍ल त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला, तो असा -
“फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हांला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत, 3म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने, सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करतो. 4तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करतो की, मेहरबानी करून आमची थोडक्यात मांडलेली बाजू ऐकावी. 5हा माणूस म्हणजे एक पीडा आहे, असे आम्हांला आढळून आले आहे. जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड करणारा असून नासरेथकर पंथाचा तो पुढारी आहे. 6ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला, त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. 7पण लुसिया सहस्त्राधिपतीने येऊन, मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून सोडवून नेले 8आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल.” 9ह्या गोष्टी अशाच आहेत, असे म्हणून यहुदी लोकांनीही दुजोरा दिला.
10राज्यपालांनी बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, “आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात, हे मला ठाऊक आहे म्हणून मी माझ्यासंबंधीच्या गोष्टींचे आनंदाने समर्थन करतो. 11आपल्याला पूर्णपणे कळून येईल की, मला यरुशलेममध्ये उपासना करावयास जाऊन अजून बारापेक्षा अधिक दिवस झाले नाहीत 12आणि मंदिरात, सभास्थानात किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकांत बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो.
13ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आत्ता करत आहेत, त्या गोष्टी त्यांना आपणापुढे सिद्ध करता येत नाहीत, 14तरीही मी आपणासमोर इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते चुकीचा मार्ग म्हणतात, त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करतो 15आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल, अशी जी आशा ते धरतात, तीच आशा मी देवाकडे पाहून धरतो. 16ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझी सद्सद्विवेकबुद्धी सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करत असतो. 17मी काही वर्षांनी माझ्या स्वतःच्या लोकांना दानधर्म व त्यांच्यासाठी यज्ञार्पणे करण्यास आलो. 18हे करत असता मी व्रतस्थ असा मंदिरात होतो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते, 19माझ्याविरुद्ध काही असते, तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता. 20किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता, माझा कोणता अपराध ह्यांना दिसून आला ते तरी ह्यांनी सांगावे. 21ह्यांच्यामध्ये उभे राहून, ‘मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुमच्यापुढे होत आहे’, हे शब्द मी मोठ्याने बोललो, हा एवढा माझा अपराध असला तर असो.”
फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो
22परंतु फेलिक्सला प्रभुमार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, “लुसिया सहस्त्राधिपती येईल, तेव्हा मी तुमच्या खटल्याविषयी निर्णय देईन.”
23त्याने शताधिपतीला हुकूम केला, “पौलाला पहाऱ्यात ठेवावे, तरी ह्याला मोकळीक असावी आणि ह्याच्या स्वकीयांना ह्याची सेवा करण्यास मनाई नसावी.” 24काही दिवसांनंतर फेलिक्स आपली यहुदी पत्नी द्रुसिल्‍ला हिच्यासह आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याच्याकडून ऐकून घेतले. 25तेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी पौल भाषण करत असता फेलिक्सने भयभीत होऊन म्हटले, “सध्या जा. संधी सापडली म्हणजे तुला परत बोलावीन.” 26शिवाय आपणास पौलाकडून पैसा मिळेल अशी आशाही त्याला होती म्हणून तो त्याला पुन्हा पुन्हा बोलावून घेऊन त्याच्याबरोबर संभाषण करत असे. 27पुढे दोन वर्षांनंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्य फेस्त ह्याची नेमणूक झाली. तेव्हा यहुदी लोकांची मर्जी राखण्यासाठी फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.

Markering

Kopiér

Sammenlign

Del

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind