لۆگۆی یوڤێرژن
ئایکۆنی گەڕان

लूक 6:27-49

लूक 6:27-49 MRCV

“पण तुम्ही जे माझे ऐकत आहात, त्यांना मी सांगतोः तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे भले करा. जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुमच्या एका गालावर चापट मारली, तर त्यांच्यापुढे दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा काढून घेतला, तर त्यांना तुमची बंडीही घेण्यास मनाई करू नका. जे तुम्हाजवळ मागतात त्यांना द्या आणि जो तुमचे घेतो, त्याची परत मागणी करू नका. जो व्यवहार इतरांनी तुमच्यासाठी करावा अशी तुमची इच्छा आहे, तसेच तुम्ही त्यांच्यासाठी करा. “जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावरच तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा काय लाभ? कारण पापी लोकही त्यांच्यावर प्रेम करणार्‍यांवर प्रेम करतात. आणि जे तुमचे भले करतात त्यांचे भले केले, तर त्यात तुम्हाला काय लाभ? पापी लोकही तसेच करतात. जे तुमचे पैसे परत करू शकतील अशी तुमची आशा आहे, त्यांनाच तुम्ही उसने देता, तर त्यात तुम्ही चांगले ते काय करता? दुष्टही आपल्या सर्व रकमेची फेड करणार्‍या दुष्टाला उसने देतो. तुमच्या शत्रूवर प्रेम करा, त्यांचे भले करा आणि परतफेड करण्याची आशा बाळगू नका. असे केले म्हणजे तुम्हाला फार मोठे प्रतिफळ मिळेल आणि तुम्ही परात्पराची लेकरे व्हाल, कारण ते अनुपकारी आणि दुष्ट यांनाही दयाळूपणाने वागवितात. जसा तुमचे पिता कनवाळू आहेत, तसे तुम्हीही व्हा. “न्याय करू नका, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही. दोषी ठरवू नका, म्हणजे तुम्हाला दोषी ठरविण्यात येणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुम्हाला क्षमा केली जाईल. द्या आणि तुम्हाला दिले जाईल. मोठ्या प्रमाणात दाबून, हालवून, ओसांडून वाहू लागेल अशा मापाने परत मिळेल. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल.” येशूंनी त्यांना हा दाखलासुद्धा सांगितला: “आंधळा मनुष्य दुसर्‍या आंधळ्याला वाट दाखवू शकतो काय? ते दोघेही खड्ड्यात पडणार नाहीत काय? शिष्य गुरूपेक्षा किंवा दास धन्यापेक्षा थोर नाही. परंतु प्रत्येकजण जो पूर्णतः प्रशिक्षित होतो तो आपल्या गुरू सारखा होईल. “आपल्या डोळ्यातील मुसळाकडे लक्ष न देता तू आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? जेव्हा तू स्वतःच्या डोळ्यामध्ये मुसळ पाहण्यास अपयशी होतो, तेव्हा ‘तुझ्या डोळ्यातील कुसळ मला काढू दे,’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणू शकतोस? अरे ढोंगी माणसा! पहिल्याने तू आपल्या डोळ्यातील मुसळ काढ, मग तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्ट दिसेल. “चांगल्या जातीचे झाड वाईट फळ देत नाही किंवा वाईट जातीचे झाड चांगले फळ देत नाही. प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. लोक काटेरी झुडूपावरून अंजीर काढीत नाहीत किंवा काटेरी झुडूपावरून द्राक्षे काढीत नाहीत. कारण अंतःकरणात जे भरलेले असते तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा मनुष्य वाईट गोष्टी बाहेर काढतो. “तुम्ही मला, ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे का म्हणता आणि मी जे सांगितले ते करीत नाही? असे प्रत्येकजण जे माझ्याकडे येतात आणि माझी वचने ऐकतात आणि त्याप्रमाणे वागतात, ते कशाप्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवितो. ते कोणाएका मनुष्यासारखे आहेत, ज्याने खोल पाया खणून आपले घर खडकावर बांधले. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा त्या घरावर जोराने आदळला; तरी त्यामुळे ते घर हलू शकले नाही, कारण ते भक्कमपणे बांधले होते. जे कोणी माझी वचने ऐकतात पण ते आचरणात आणत नाहीत, तर ते पाया न घालता आपले घर वाळूवर बांधण्यार्‍या मूर्ख माणसासारखे आहेत. ज्या क्षणी जोराचा प्रवाह त्या घरावर आदळला, त्याच क्षणी ते कोसळले आणि त्याचा संपूर्ण नाश झाला.”

پلانی خوێندنەوەی بێبەرامبەر و بابەتی پەرستشی پەیوەست بە लूक 6:27-49