प्रेषितांचे कार्य 28
28
मिलिता येथे पौल
1असे आम्ही निभावल्यावर त्या बेटाचे नाव मिलिता आहे, असे आम्हांला समजले. 2तेथील लोकांनी आमच्यावर विशेष उपकार केले, म्हणजे पाऊस व गारठा असल्यामुळे त्यांनी शेकोटी पेटवून आम्हा सर्वांचा पाहुणचार केला. 3पौलने काटक्यांची मोळी आणून शेकोटीवर घातली. इतक्यात उष्णता झाल्यामुळे एक साप बाहेर निघून त्याच्या हातास झोंबून राहिला. 4तो साप त्याच्या हाताला लटकलेला पाहून तेथील रहिवासी एकमेकांना म्हणू लागले, “खरेच, हा माणूस खुनी आहे, हा समुद्रातून वाचला तरी न्यायदेवता त्याला जगू देणार नाही.” 5त्याने तर तो साप विस्तवात झटकून टाकला. पौलाला काही इजा झाली नाही. 6त्याला सूज येईल अथवा तो एकाएकी मरून पडेल ह्याची ते वाट पाहत होते, पण बराच वेळ वाट पाहिल्यावर त्याला काही विकार झाला नाही, असे पाहून ते आपले मत बदलून म्हणाले, “हा कोणी देव आहे.”
7तिकडे त्या बेटावरील पुब्ल्य नावाच्या मुख्य अधिकाऱ्याच्या जमिनी आसपास होत्या. त्याने आमचे स्वागत करून आदराने आमचा पाहुणचार तीन दिवस केला. 8तेव्हा असे झाले की, पुब्ल्यचा बाप तापाने व आंवरक्ताने आजारी पडला होता. त्याच्याकडे जाऊन पौलाने प्रार्थना केली व त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे केले. 9हे झाल्यावर त्या बेटामध्ये ज्या दुसऱ्या लोकांना रोग होते तेही त्याच्याकडे येऊन बरे झाले. 10तेव्हा त्यांनी आमचा नाना प्रकारे सन्मान केला आणि आम्ही जहाजाने जायला निघालो तेव्हा आमच्या गरजेच्या वस्तू त्यांनी जहाजावर भरल्या.
11ह्याप्रमाणे तीन महिन्यांनंतर आलेक्सांद्रियातील दयस्कुरै (जुळी दैवते) ह्या नावाचे जे तारू हिवाळा घालविण्याकरता त्या बेटाजवळ थांबले होते, त्यात बसून आम्ही निघालो. 12सुराकूस शहरात पोहोचल्यावर आम्ही तीन दिवस तिथे राहिलो. 13तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोना ह्या ठिकाणी आलो. दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही पुत्युल नगरास पोहचलो. 14तेथे आम्हांला बंधुजन भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर सात दिवस राहावयाचे आम्हांला आमंत्रण दिले, अशा रितीने आम्ही रोम शहराजवळ आलो. 15तेथले बंधुजन आमच्याविषयी ऐकून अप्पियाची बाजारपेठ व तीन उतारशाळा नावाच्या ठिकाणापर्यंत आम्हांला सामोरे आले, त्यांना पाहून पौलने देवाचे आभार मानले, त्याला बराच धीर आला.
16आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
पौल रोममधील यहुदी लोकांच्या भेटी घेतो
17तीन दिवसांनंतर पौलाने यहुदी लोकांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनहो, “मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या चालीरीतींविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले. 18त्यांनी चौकशी केल्यावर मी मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केला नाही, हे कळल्यावर ते मला सोडू पाहत होते, 19परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही. 20ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर बोलावे म्हणून तुम्हांला बोलावले. इस्राएली लोकांनी ज्याची आशा बाळगली आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साखळीने बांधलेला आहे.”
21त्यांनी त्याला म्हटले, “आपल्यासंबंधाने यहुदियातून आम्हांला काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणांविषयी काही प्रतिकूल वृत्तांत आणला नाही अथवा काही सांगितलेही नाही. 22तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.”
23म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता. 24त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. 25त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की,
26ह्या लोकांकडे जाऊन सांग की,
‘तुम्ही ऐकाल तर खरे,
परंतु तुम्हांला समजणार नाही
व पाहाल तर खरे,
परंतु तुम्हांला आकलन होणार नाही.
27कारण ह्या लोकांचे अंतःकरण
जड झाले आहे.
ते कानांनी मंद ऐकतात
आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत,
ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये,
कानांनी ऐकू नये,
मनाने समजू नये,
त्यांचे परिवर्तन होऊ नये
आणि मी त्यांना बरे करू नये’.
28म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.”
29तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले.
समारोप
30पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. 31तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
Trenutno izabrano:
प्रेषितांचे कार्य 28: MACLBSI
Istaknuto
Kopiraj
Uporedi
Podeli
Želiš li da tvoje istaknuto bude sačuvano na svim tvojim uređajima? Kreiraj nalog ili se prijavi
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.