मत्तय 5

5
डोंगरावरील प्रवचन
1तेव्हा त्या लोकसमुदायांना पाहून तो डोंगरावर चढला, व तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले.
2मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला.
धन्यवाद
3“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
4‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
5‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’
6जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
7जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
8‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
9जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
10नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य,
कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
11माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य.
12आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
मिठावरून व दिव्यावरून शिकवलेले धडे
13तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
14तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.
15दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो.
16त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
जुने नियमशास्त्र व येशूची शिकवण
17नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करण्यास मी आलो आहे असे समजू नका; मी रद्द करण्यास नव्हे तर पूर्ण करण्यास आलो आहे.
18कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
19ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञांतील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील.
20मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परूशी ह्यांच्या नीतिमत्त्वापेक्षा तुमचे नीतिमत्त्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
राग व खून
21‘खून करू नकोस आणि जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल,’ असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
22मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर [उगाच] रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल.
23ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले,
24तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर.
25वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर; नाहीतर कदाचित वादी तुला न्यायाधीशाच्या हाती देईल, न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल, आणि तू तुरुंगात पडशील.
26मी तुला खचीत सांगतो दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणार नाहीस.
अशुद्धता
27‘व्यभिचार करू नकोस’ म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
28मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.
29तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
30तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
31‘कोणी आपली बायको टाकली तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हेही सांगितले होते.
32मी तर तुम्हांला सांगतो की, जो कोणी आपली बायको व्यभिचाराच्या कारणावाचून टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या बायकोबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
शपथा व खरेपणा
33‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्‍या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे.
34मी तर तुम्हांला सांगतो, शपथ वाहूच नका; ‘स्वर्गाची’ नका, कारण ‘ते देवाचे राजासन आहे;’
35‘पृथ्वीचीही’ वाहू नका, कारण ‘ती त्याचे पादासन आहे;’ यरुशलेमेचीही नका, कारण ती ‘थोर राजाची’ नगरी आहे.
36आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नकोस, कारण तू आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस.
37तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.
सूड
38‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
39मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर;
40जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे;
41आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा.
42जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.
प्रेम व सर्वांगपूर्ण शील
43‘आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर व आपल्या वैर्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे.
44मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्‍यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
45अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगववतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
46कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारही तसेच करतात ना?
47आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना?
48ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’

Выделить

Поделиться

Копировать

None

Хотите, чтобы то, что вы выделили, сохранялось на всех ваших устройствах? Зарегистрируйтесь или авторизуйтесь

YouVersion использует файлы cookie, чтобы персонализировать ваше использование приложения. Используя наш веб-сайт, вы принимаете использование нами файлов cookie, как описано в нашей Политике конфиденциальности