Zephaniah 3:14-20

सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल. जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे. पाहा, त्या समयी तुला पिडणार्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन. त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”
सफन्या 3:14-20