Zechariah 14:8-16

त्या दिवशी आणखी असे होईल की यरुशलेमेतून जिवंत पाण्याचे झरे फुटून वाहतील; अर्धे पूर्वसमुद्राकडे व अर्धे पश्चिमसमुद्राकडे वाहतील; उन्हाळ्यात व हिवाळ्यात तसेच होईल. तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील. तेव्हा सर्व देश यरुशलेमेच्या दक्षिणेस असलेली गेबा व रिम्मोन ह्यांमधील अराबाप्रमाणे होईल; यरुशलेमेचा उद्धार होऊन बन्यामिनाच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत, कोपरावेशीपर्यंत तसेच हनानेलाच्या बुरुजापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत ते आपल्या स्थळी वसेल. लोक त्यात वस्ती करतील; ह्यापुढे त्यावर शाप राहायचा नाही; तर ते निर्भय असे वसेल. तेव्हा ज्या राष्ट्रांनी यरुशलेमेबरोबर लढाई चालवली त्या सर्वांचा संहार परमेश्वर ज्या मरीने करील ती ही : ते पायांवर उभे असता त्यांचे मांस कुजेल, त्यांचे डोळे जागच्या जागी सडतील, त्यांच्या मुखात त्यांची जिव्हा सडेल. त्या दिवशी असे होईल की, परमेश्वराकडून त्यांची फार त्रेधा उडेल, ते प्रत्येक आपापल्या शेजार्याचा हात धरतील; आणि त्या प्रत्येकाचा हात आपल्या शेजार्याच्या हाताशी प्रतिकार करील. यहूदाही यरुशलेमेत युद्ध करील; आसपासच्या सर्व राष्ट्रांतील धन जमा होईल; सोने, रुपे व पोशाख ह्यांचा पूर लोटेल. तसेच ह्या मरीप्रमाणे घोड्यांवर, खेचरांवर, उंटांवर, गाढवांवर व त्यांच्या लष्करात असलेल्या सर्व जनावरांवर मरी येईल. आणखी असे होईल की यरुशलेमेवर चढाई करून आलेल्या राष्ट्रांपैकी अवशिष्ट राहिलेले सर्व, राजाधिराज सेनाधीश परमेश्वर ह्याचे भजनपूजन करण्यासाठी व मंडपाचा सण पाळण्यासाठी प्रतिवर्षी यरुशलेमेस वर जातील.
जखर्या 14:8-16