De Brief van den Apostel Paulus aan de Romeinen 5:1-17

ह्यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते; आणि ‘आशा लाजवत नाही;’ कारण आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरून त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झाला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहोत; इतकेच केवळ नाही, तर ज्याच्या द्वारे समेट ही देणगी आपल्याला आता मिळाली आहे त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान बाळगतो. एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. कारण नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच; पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही. तथापि, आदामापासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही त्याने राज्य केले; आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे. परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही; कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरता विशेषेकरून विपुल झाली. आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याच्या द्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही; कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो न्याय एकाच मनुष्यापासून झाला, पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. कारण जर त्या एकाच इसमाच्या द्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषेकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
रोमकरांस पत्र 5:1-17