Psalms 51:1-19

हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुऊन माझा दोष पूर्णपणे काढून टाक, माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे. तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील. पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे. एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन; मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन. आनंदाचे व हर्षाचे शब्द माझ्या कानी पडू दे; म्हणजे तू मोडलेली माझी हाडे उल्लासतील. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव; माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर; माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्यापुढून घालवून देऊ नकोस; आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे; आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर; म्हणजे मी अपराध्यांना तुझे मार्ग शिकवीन; आणि पातकी तुझ्याकडे वळतील. हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील. हे प्रभू, माझे ओठ उघड; म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही, नाहीतर तो मी केला असता; होमबलीही तुला प्रिय नाही. देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा; हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ; म्हणजे नीतिमत्त्वपूर्वक केलेले यज्ञ, होमबली, निःशेष होमबली तुला आवडतील; मग ते तुझ्या वेदीवर गोर्हे अर्पण करतील.
स्तोत्रसंहिता 51:1-19