Psalms 104:24-34

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सुज्ञतेने केलीस; तुझ्या समृद्धीने पृथ्वी भरलेली आहे. हा समुद्र अफाट व विस्तीर्ण आहे, त्यात लहानमोठे असंख्य जलचर विहार करतात. पाहा, त्यात गलबते चालतात, त्यात क्रीडा करण्यासाठी तू निर्माण केलेला लिव्याथान1 तेथे आहे. तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाली देतोस म्हणून ते सर्व तुझी वाट पाहतात. जे तू त्यांना घालतोस ते ते घेतात; तू आपली मूठ उघडतोस तेव्हा उत्तम पदार्थांनी त्यांची तृप्ती होते. तू आपले तोंड लपवतोस तेव्हा ते व्याकूळ होतात; तू त्यांचा श्वास काढून घेतोस तेव्हा ते मरतात व मातीस मिळतात. तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात, व तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करतोस. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो! परमेश्वराला आपल्या कृतींपासून आनंद होवो! तो पृथ्वीकडे पाहतो तेव्हा ती कापते; तो पर्वतांना स्पर्श करतो तेव्हा ते धुमसतात. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत मी परमेश्वराचे गुणगान गाईन; मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या देवाचे स्तोत्र गाईन. मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.
स्तोत्रसंहिता 104:24-34