John 7:37-44

मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्त्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” (ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले; तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता; कारण येशूचा तोपर्यंत गौरव झाला नव्हता.) लोकसमुदायातील कित्येक जण हे शब्द ऐकून म्हणत होते, “हा खरोखर तो संदेष्टा आहे.” कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येतो काय? ‘दाविदाच्या वंशाचा’ व ज्या ‘बेथलेहेमात’ दावीद होता त्या गावातून ख्रिस्त ‘येणार’ असे शास्त्रात सांगितले नाही काय?” ह्यावरून त्याच्यामुळे लोकसमुदायात फूट पडली. त्यांच्यातील कित्येक जण त्याला धरायला पाहत होते. तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही.
योहान 7:37-44