John 15:12-27

जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांकरता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी आतापासून तुम्हांला दास म्हणत नाही; कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते; परंतु मी तुम्हांला मित्र म्हटले आहे; कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे; ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हांला द्यावे. तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हांला ह्या आज्ञा करतो. जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हांला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. ‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हांला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील; परंतु ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हांला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत. मी आलो नसतो व त्यांच्याबरोबर बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते; परंतु आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही. जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. जी कृत्ये दुसर्या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते, परंतु आता त्यांनी मला व माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे. तथापि ‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते. परंतु जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुमच्याकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल; आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहात.
योहान 15:12-27