Jeremia 29:10-21

परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन. तुम्ही म्हणता की, ‘परमेश्वराने बाबेलात आमच्यासाठी संदेष्टे उत्पन्न केले;’ पण दाविदाच्या सिंहासनावर बसलेल्या राजांविषयी व ह्या नगरात राहणारे सर्व लोक, म्हणजे अर्थात तुमचे बांधव तुमच्याबरोबर बंदिवान होऊन गेले नाहीत त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो : पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत. मी तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी त्यांची पाठ पुरवीन; सर्व पृथ्वीवरील राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून दिले त्या सर्व राष्ट्रांत ते शाप, विस्मय, उपहास आणि निंदा ह्यांचे विषय होतील. परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे संदेष्टे त्यांना माझी वचने देऊन मी मोठ्या निकडीने त्यांच्याकडे पाठवत आलो तरी त्यांनी ती ऐकली नाहीत; आणि तुम्हीही ती ऐकत नाही, असे परमेश्वर म्हणतो. बंदिवासातले लोकहो, ज्या तुम्हांला मी यरुशलेमेहून बाबेलास पाठवले ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. ‘कोलायाचा पुत्र अहाब आणि मासेयाचा पुत्र सिद्कीया हे माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याच्या हाती देईन; व तो त्यांना तुमच्या डोळ्यांदेखत वधील.
यिर्मया 29:10-21