James 3:9-16

तिच्या योगे, जो प्रभू व पिता त्याची आपण स्तुती करतो; आणि ‘देवाच्या प्रतिमेप्रमाणे’ केलेल्या माणसांना तिच्याच योगे शापही देतो. एकाच तोंडातून स्तुती व शाप निघतात. माझ्या बंधूंनो, ह्या गोष्टी अशा प्रकारे होता कामा नयेत. झर्याच्या एकाच छिद्रातून गोड पाणी व कडू पाणी निघते काय? माझ्या बंधूंनो, अंजिराला जैतुनाची फळे किंवा द्राक्षवेलाला अंजीर येतील काय? तसेच खार्या पाण्यातून गोड पाणी निघणार नाही. तुमच्यामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावीत. पण तुमच्या मनात तीव्र मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तर ताठा मिरवू नका व सत्याविरुद्ध लबाडी करू नका. हे ज्ञान वरून उतरत नाही; तर ते ऐहिक, इंद्रियजन्य, सैतानाकडले आहे. कारण जेथे मत्सर व तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था व प्रत्येक कुकर्म आहे.
याकोब 3:9-16