Isaiah 25:8-12

तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या दिवशी ते म्हणतील, “पाहा, हा आमचा देव! ह्याची आम्ही आशा धरून राहिलो; तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. ह्याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू.” परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील. जसा पोहणारा पोहण्यासाठी झेपा टाकतो तसा तो तिच्यात झेपा टाकील; त्याने आपल्या हाताची करामत कितीही चालवली तरी परमेश्वर त्याचा गर्व दडपून टाकील. तो तुझी उंच तटबंदी पाडून कोसळून टाकील, आणि जमीनदोस्त करून धुळीस मिळवील.
यशया 25:8-12