सफन्या 3:14-20
सफन्या 3:14-20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सियोन कन्ये, गा आणि हे इस्राएल, आनंदाने जल्लोष कर! यरूशलेमेच्या कन्ये, आनंद व उल्लास कर! कारण परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे; त्यांने तुझ्या शत्रूला घालवून दिले आहे! इस्राएलचा राजा, परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. आता तुला कोणत्याही अरिष्टाची भीती बाळगण्याचे कारण नाही! त्या दिवशी ते यरूशलेमेला असे म्हणतील, “घाबरू नको! हे सियोना तुझे हात लटपटू देऊ नको. परमेश्वर तुझा देव, तुझ्यामध्ये आहे, तो तुला वाचवायला पराक्रमी असा आहे; तो हर्षाने तुझ्याविषयी आनंद करील, तो त्याच्या प्रेमासोबत तुझ्याकडे शांती घेऊन येईल. तो गायनाने तुझ्याविषयी आनंद करील. जे लोक सणाच्या वेळेकरता दु:ख करीत आहेत त्यांना मी एकत्र करीन. मी तुझी निंदा आणि नाश होण्याची भीती तुझ्यापासून दूर करेन. त्यावेळी, तुला जे पीडतात त्यांचा मी नायनाट करीन, जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, आणि ज्यांना घालवून दिले आहे त्यांना गोळा करीन, आणि ज्या प्रत्येक देशात त्यांची अप्रतिष्ठा झाली, त्यामध्ये मी त्यांना प्रशंसा व कीर्ती मिळवून देईन. त्यावेळी, मी तुला परत आणीन आणि मी तुम्हा सर्वांना परत एकत्र करीन, मी तुला पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये प्रसिध्दी व कीर्ती मिळवून देईन. तुझ्या डोळ्यांदेखत मी तुझे भविष्य पुनर्संचयित करीन.” असे परमेश्वर म्हणतो!
सफन्या 3:14-20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
हे सीयोनकन्ये, तू गीत गा; हे इस्राएला, तू मोठ्याने गजर कर! अगे यरुशलेमकन्ये, अगदी मनापासून आनंद कर, उल्लास कर. कारण याहवेहने तुझी शिक्षा काढून घेतली आहे, तुझ्या शत्रूचे सैन्य परत गेले आहे. याहवेह, इस्राएलचे राजा तुझ्यासह आहेत; यापुढे हानीचे भय तू बाळगणार नाही. त्या दिवशी ते यरुशलेमला असे म्हणतील, “हे सीयोना, भिऊ नकोस, तुझे बाहू दुर्बल होऊ देऊ नकोस. महाप्रतापी योद्धा जे रक्षणकर्ता आहेत, ते याहवेह तुझे परमेश्वर तुझ्यासह आहेत. त्यांना तुझ्यामुळे अत्यंत आनंद होतो; तुझ्यावरील प्रीतीमुळे ते तुजवर दोषारोपण करणार नाहीत. त्याऐवजी तुझ्याबद्दल ते गीत गाऊन उल्हास व्यक्त करतील.” “जे निर्धारित सण तुझ्याकरिता ओझे व कलंक आहेत, ते सण साजरे करता आले नाही म्हणून जे लोक शोक करतात, त्या सर्वांना मी तुझ्यामधून काढून टाकेन. त्या समयी ज्यांनी तुझ्यावर जुलूम केला त्यांना मी अतिशय कडक शिक्षा करेन. त्या सर्वांचा मी जाब घेईन. जे लंगडे आहेत त्यांची मी सोडवणूक करेन; बंदिवासात गेलेल्यांना मी एकत्र करेन. जिथे ते लज्जित झाले त्या प्रत्येक भूमीवर त्यांना मी प्रशंसा व गौरव बहाल करेन. त्यावेळी मी तुम्हा सर्वांना एकत्र गोळा करेन; त्यावेळी मी तुम्हाला घरी परत आणेन. जेव्हा मी तुमची संपन्नता तुम्हाला परत देईन तेव्हा पृथ्वीवरील सर्व लोकांमध्ये, स्वतःच्या दृष्टीसमोर मी तुम्हाला गौरव व प्रशंसा बहाल करेन,” असे याहवेह म्हणतात.
सफन्या 3:14-20 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सीयोनकन्ये, उच्च स्वराने गा; हे इस्राएला, जयजयकार कर; यरुशलेमकन्ये, मनःपूर्वक उल्लास व उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझ्या शत्रूचे निवारण केले आहे; इस्राएलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे; तुला पुन्हा अरिष्टाची भीती प्राप्त होणार नाही. त्या दिवशी यरुशलेमेस म्हणतील : “हे सीयोने, भिऊ नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल. जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यांना मी एकत्र मिळवीन; त्यांच्यावर निंदेचा भार पडला आहे. पाहा, त्या समयी तुला पिडणार्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी वाचवीन, हाकून दिलेलीस परत आणीन, अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व नावलौकिक व्हावा असे मी करीन. त्या समयी मी तुम्हांला आणून एकत्र करीन; तुमच्या डोळ्यांदेखत तुमचा बंदिवास उलटवीन; तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांत तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन.”