YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 7:1-17

प्रकटी 7:1-17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि त्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोनावर उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला. यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर; शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर; जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर; शिक्का मारण्यात आला. या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन. तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?” मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या समर्पणाच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो राजासनावर बसलेला आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकील.

सामायिक करा
प्रकटी 7 वाचा

प्रकटी 7:1-17 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

त्यानंतर पृथ्वीच्या चारही कोपर्‍यांवर चार देवदूत उभे राहिलेले मी पाहिले. पृथ्वीवरील भूमी, समुद्र किंवा कोणताही वृक्ष, यावर वाहू नये म्हणून ते त्या चारही वार्‍यांना थोपवून धरीत होते. मग दुसरा देवदूत पूर्वेच्या दिशेने हातात जिवंत परमेश्वराचा शिक्का घेऊन येताना मी पाहिला. पृथ्वीला व समुद्राला इजा करण्याचे काम ज्या चार देवदूतांवर सोपविले होते, त्या चार देवदूतांना तो ओरडून म्हणाला, “आम्ही परमेश्वराच्या सेवकांच्या कपाळावर परमेश्वराचा शिक्का मारीपर्यंत पृथ्वी, समुद्र किंवा वृक्ष यांना काहीही इजा करू नका.” ज्या लोकांवर हा शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली: ते इस्राएलच्या सर्व बारा वंशांमधून 1,44,000 लोक होते. यहूदाह वंशातून 12,000; रऊबेन वंशातून 12,000; गाद वंशातून 12,000; आशेर वंशातून 12,000; नफताली वंशातून 12,000; मनश्शेह वंशातून 12,000; शिमोन वंशातून 12,000; लेवी वंशातून 12,000; इस्साखार वंशातून 12,000; जबुलून वंशातून 12,000; योसेफ वंशातून 12,000; बन्यामीन वंशातून 12,000. यानंतर मी पाहिले आणि सर्व राष्ट्रे, वंश, लोक व भाषा यातील इतके लोक होते की त्यांचे मोजमाप करणे अशक्य होते. ते सर्व शुभ्र वस्त्रे घालून, हातात खजुरीच्या झावळ्या घेऊन, राजासनासमोर आणि कोकरासमोर उभे होते. ते प्रचंड आवाजात घोषणा करीत होते: “राजासनावर बसलेल्या आमच्या परमेश्वरापासून आणि कोकर्‍यापासून तारणप्राप्ती होत आहे.” तेव्हा सर्व देवदूत राजासन व वडीलजन आणि चार सजीव प्राणी यांच्याभोवती उभे होते आणि राजासनासमोर दंडवत घालून उपासना करीत असताना ते म्हणाले: “आमेन! आमच्या परमेश्वराला धन्यवाद, गौरव, सुज्ञता, उपकारस्तुती, मान, सामर्थ्य आणि पराक्रम सदासर्वकाळ असो. आमेन!” मग या चोवीस वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “हे शुभ्र पोशाख घातलेले कोण आहेत व ते कुठून आले आहेत?” मी म्हटले, “महाराज, ते तुम्हाला माहीत आहे.” तेव्हा ते म्हणाले, “जे महान संकटातून निभावून येतात, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकर्‍याच्या रक्ताने धुऊन शुभ्र केले आहेत. म्हणूनच, “आज ते येथे परमेश्वराच्या राजासनासमोर, त्यांच्या मंदिरात, त्यांची अहोरात्र सेवा करीत आहेत. जे राजासनावर बसलेले आहेत, ते त्यांच्या सानिध्यात त्यांना आश्रय देतील. त्यांना पुन्हा कधी भूक, किंवा तहान लागणार नाही; त्यांना सूर्याचा ताप, किंवा दाहक उष्णता बाधणार नाही. कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल, ‘ते त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍याजवळ नेईल,’ ‘आणि परमेश्वर त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रू पुसून टाकतील.’”

सामायिक करा
प्रकटी 7 वाचा

प्रकटी 7:1-17 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनांवर’ उभे राहिलेले पाहिले, ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे ‘चार वारे’ अडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपवले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, “आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या ‘कपाळांवर’ आम्ही ‘शिक्का मारीपर्यंत’ पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. यहूदा वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला; रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर; शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर; जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामिन वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. ह्यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हातांत झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकर्‍यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!” तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले : “आमेन; धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहेत! आमेन.” तेव्हा वडीलमंडळापैकी एकाने मला म्हटले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?” मी म्हटले, “प्रभो, हे तुला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोकर्‍याच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि ‘राजासनावर बसलेला’ त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ह्यापुढे ‘भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेही होणार नाहीत; त्यांना सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.’ कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा ‘मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झर्‍यांजवळ नेईल; आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”’

सामायिक करा
प्रकटी 7 वाचा

प्रकटी 7:1-17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यानंतर मी चार देवदूत पृथ्वीच्या चार कोपऱ्यांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे चार वारे अडवून धरत होते. मी आणखी एक देवदूत पूर्व दिशेने वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते, त्यांना तो ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे जे दास आहेत, त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका.” ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली. इस्त्राएली लोकांच्या बारा वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला. प्रत्येक वंशापैकी बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला. इस्त्राएली लोकांचे बारा वंश पुढीलप्रमाणे: यहुदा, रऊबेन, गाद, आशेर, नफताली, मनश्शे, शिमोन, लेवी, इस्साखार, जबुलून, योसेफ व बन्यामीन. ह्यानंतर शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा बोलणारे यांचे असंख्य लोक राजासनासमोर व कोकरासमोर उभे राहिलेले माझ्या दृष्टीस पडले. ते उच्च स्वराने म्हणत होते, “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडे व कोकराकडे तारण आहे.” तेव्हा राजासन, वडीलजन व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर लोटांगण घालून देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! धन्यवाद, गौरव, सुज्ञता, आभारप्रदर्शन, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुगे आमच्या देवाची आहेत, आमेन!” तेव्हा वडीलजनांपैकी एकाने मला विचारले, “शुभ्र झगे परिधान केलेले हे कोण आहेत व कोठून आले?” मी त्याला म्हटले, “महाशय, हे तुम्हांला ठाऊक आहे.” तो मला म्हणाला, “मोठ्या छळणुकीला सामोरे जाऊन येथे आले आहेत, ते हे आहेत. त्यांनी आपले झगे कोकराच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत. ह्यामुळे ते देवाच्या राजासनासमोर उभे आहेत. ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात आणि राजासनावर बसलेला त्यांच्याबरोबर वसती करील. ते ह्यापुढे भुकेले व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा कोणतीही भस्मसात करणारी उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेले कोकरू त्यांचा मेंढपाळ होईल व तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल आणि देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील.”

सामायिक करा
प्रकटी 7 वाचा