YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रकटी 19:1-16

प्रकटी 19:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत, कारण त्याचे न्याय खरे आणि नीतीचे आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे. आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी राजासनावर बसलेल्या देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; हालेलूया. आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा. आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, हालेलूया; कारण, आमचा प्रभू सर्वसत्ताधारी देव हा राज्य करीत आहे. या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.) आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः कोकऱ्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.” आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.” तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव विश्वासू आणि खरा आहे, तो नीतीने न्याय करतो, आणि युद्ध करतो, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे; आणि स्वर्गातल्या सेना पांढऱ्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तलवार निघते, तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील; तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील. त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे.

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-16 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

यानंतर मी ऐकले, स्वर्गात जणू काही एक मोठा जनसमुदाय गर्जना करून म्हणत आहे: “हाल्लेलूयाह! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या परमेश्वराची आहेत! कारण त्यांचे निर्णय सत्य व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली होती, तिला त्यांनी दंड केला आहे आणि आपल्या सेवकांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे.” आणि पुन्हा त्यांनी घोषणा केली: “हाल्लेलूयाह” तिचा धूर सदासर्वकाळ वर जात आहे. तेव्हा ते चोवीस वडीलजन व चार सजीव प्राणी यांनी राजासनावर बसलेल्या परमेश्वरासमोर दंडवत घालून त्यांना नमन करीत म्हटले, “आमेन! हाल्लेलूयाह!” तेव्हा राजासनातून एक वाणी निघाली. ती म्हणाली, “परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या त्यांच्या सर्व लहान थोर सेवकहो, आपल्या परमेश्वराचे स्तवन करा.” नंतर मी एका विराट लोक समुदायाची, पाण्याच्या उसळत्या प्रवाहासारखी गर्जना किंवा विजांच्या प्रचंड गडगडाटासारखी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “हाल्लेलूयाह, कारण आमचे प्रभू, सर्वसमर्थ परमेश्वर, राज्य करतात! चला, आपण आनंदोत्सव करू, उल्लास करू व त्यांचे गौरव करू, कारण कोकर्‍याच्या विवाहाची वेळ झाली आहे. त्यांच्या वधूने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे,” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, असे लिही “कोकराच्या विवाहाच्या मेजवानीस आमंत्रित केलेले ते धन्य!” तो मला असेही म्हणाला, “ही परमेश्वराची सत्यवचने आहेत.” तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.” तेव्हा मी स्वर्ग उघडलेला पाहिला आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा व त्यावर जो बसला होता त्याचे नाव “विश्वासू आणि खरा” आहे. तो नीतीने न्याय आणि युद्ध करतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. त्याने रक्तात बुचकळलेली वस्त्रे पांघरलेली होती. “परमेश्वराचा शब्द” हे त्याचे नाव होते. स्वर्गातील सैन्य उत्तम, तलम, पांढरी स्वच्छ वस्त्रे परिधान करून आणि पांढर्‍या घोड्यांवर स्वार होऊन त्यांच्यामागून चालत होते. “त्यांनी राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण तलवार निघाली.” ते त्यावर लोह-राजदंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ परमेश्वराच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड ते तुडवतील. त्यांच्या वस्त्रावर व मांडीवर हे नाव लिहिलेले होते: राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘हालेलूया!’ तारण, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही प्रभू जो आमचा देव ह्याची आहेत; कारण ‘त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे’ व ‘नीतीचे’ आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”’ ते दुसर्‍यांदा म्हणाले, “हालेलूया! तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.” तेव्हा ते चोवीस वडील व ते चार प्राणी उपडे पडून ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन करताना म्हणाले, “आमेन; हालेलूया!” इतक्यात ‘राजासनापासून’ वाणी झाली; ती म्हणाली, “अहो आमच्या देवाची ‘भीती बाळगणार्‍या सर्व लहानथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.”’ तेव्हा ‘जणू काय’ मोठ्या ‘समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी’ व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला; तो म्हणाला, “‘हालेलूया; कारण’ सर्वसमर्थ आमचा ‘प्रभू’ देव ह्याने ‘राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद’ व ‘उल्लास करू’ व त्याचा गौरव करू; कारण कोकर्‍याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो मला म्हणाला, “हे लिही की, कोकर्‍याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलावलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.” तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. नमन देवाला कर;” कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म1 आहे. ‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो. ‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते; स्वर्गातील सैन्ये पांढर्‍या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’ त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव लिहिलेले आहे.

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा

प्रकटी 19:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जणू एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, “देवाचा गौरव असो! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत!” कारण त्याचे न्याय सत्याचे व न्याय्य आहेत. ज्या मोठ्या वेश्येने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्यायविवाडा त्याने केला आहे आणि आपल्या दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड उगवला आहे. ते दुसऱ्यांदा म्हणाले, “हालेलूया! तिला भस्मसात करणाऱ्या ज्वालांचा धूर युगानुयुगे वर चढत आहे!” तेव्हा ते चोवीस वडीलजन व ते चार प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाची आराधना करीत म्हणाले, “आमेन! हालेलूया!” इतक्यात राजासनाकडून वाणी झाली, ती म्हणाली, “अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लाहनथोर दासांनो, त्याचे स्तवन करा.” तेव्हा जणू काही मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला, त्याने घोषणा केली, “हालेलूया! कारण सर्वसमर्थ आमचा प्रभू देव ह्याने राजाधिकार हाती घेतला आहे.” आपण आनंद करू व उ्रास करू व त्याचा गौरव करू कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या वधूने स्वतःला सजविले आहे, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसावयाला दिले आहे, ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र लोकांची नीतिकृत्ये आहेत. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “कोकराच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.” तो मला असेही म्हणाला, “ही देवाची सत्यवचने आहेत.” तेव्हा मी त्याच्या पाया पडून त्याची आराधना करणार होतो, परंतु तो मला म्हणाला, “तू असे मुळीच करू नकोस! मी तुझा आणि जे येशूविषयीची साक्ष देतात त्या तुझ्या बंधूंचा दास आहे. देवाची आराधना कर, कारण येशूविषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे.” त्यानंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो न्यायबुद्धीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ रत्नजडित मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले होते. ते त्याच्यावाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुडवून काढलेला झगा त्याने अंगावर घातला होता. ‘देवाचा शब्द’ हे त्याचे नाव होते. स्वर्गातील सैन्ये पांढऱ्या घोड्यांवर बसून स्वच्छ पांढरी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती. त्याने राष्ट्रांवर वार करावा म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघाली. तो त्यांवर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देवाच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे कुंड तो तुडवील. त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ हे नाव लिहिलेले होते.

सामायिक करा
प्रकटी 19 वाचा