प्रकटी 11:1-14
प्रकटी 11:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा बोरू देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे. पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते परराष्ट्रीयांना दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली तुडवतील. आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.” हे साक्षीदार म्हणजे पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे व दोन समया ही ते आहेत. जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो. जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे. या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. तेथे मोठ्या नगराच्या म्हणजे आत्मिक अर्थाने सदोम आणि मिसर म्हणले आहे व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत. त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते. आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणाऱ्यांना मोठे भय वाटले. आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैऱ्यांनी त्यांना पाहिले. आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले. दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
प्रकटी 11:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग मला एक मापनपट्टी देण्यात आली आणि मला सांगण्यात आले, “जा परमेश्वराच्या मंदिराचे आणि वेदीचे मोजमाप उपासकांसहित घे. पण पवित्र मंदिरा बाहेरच्या अंगणाचे माप घेऊ नको, कारण ते गैरयहूदीयांना देण्यात आले आहे. गैरयहूदी राष्ट्रे यरुशलेम शहरास बेचाळीस महिने पायाखाली तुडवतील. आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना गोणपाट नेसून 1,260 दिवस भविष्य सांगण्यासाठी निवडणार आहे.” “ते दोन साक्षीदार पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असलेले दोन जैतून वृक्ष” व दोन समया आहेत. आणि त्यांना कोणी अपाय करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या तोंडातून अग्नी निघतो आणि त्यांच्या शत्रूंना गिळून घेतो आणि जर कोणी मनुष्य त्यांना अपाय करू इच्छील तर तो अशाप्रकारे मारला जाणे आवश्यक आहे. त्यांच्या भविष्यवाणी करण्याच्या काळात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे; तसेच पृथ्वीवरील नद्यांचे व समुद्रांचे पाणी रक्तमय करण्याचा व त्यांना वाटेल तेव्हा आणि वाटेल तितक्या वेळा, लोकांत पीडा उत्पन्न करण्याचाही अधिकार देण्यात आला आहे. त्यांची साक्ष संपल्यानंतर, अथांग कूपातून येणारा पशू त्यांच्याविरुद्ध लढाई करेल आणि त्यांचा पाडाव करून त्यांना ठार करेल. ज्या मोठ्या शहराला लाक्षणिक अर्थाने सदोम आणि इजिप्त असे म्हटले आहे आणि ज्या शहरात त्यांच्या प्रभूला क्रूसावर खिळण्यात आले होते, त्या शहरातील रस्त्यांवर त्यांची प्रेते पडून राहतील. सर्व लोक, वंश, भाषा आणि राष्ट्रे त्यांची प्रेते साडेतीन दिवस टक लावून पाहतील आणि त्यांना पुरण्यास नकार देतील. उलट, आपला इतका छळ करणार्या या दोन संदेष्ट्यांच्या मृत्यूबद्दल सर्व जगभर लोक जागोजागी आनंदोत्सव करतील, एकमेकांना भेटी देतील. पुढे साडेतीन दिवसानंतर परमेश्वरापासून येणारा जीवनदायी श्वास त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. मग स्वर्गातून एक मोठी वाणी त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी ऐकली. ती म्हणाली, “इकडे वर या!” तेव्हा ते आपल्या शत्रूंच्या देखत मेघारूढ होऊन स्वर्गात वर गेले. त्याच घटकेस एक प्रचंड भूमिकंप झाला आणि शहराचा एक दशांश भाग जमीनदोस्त होऊन, सात हजार लोक मरण पावले. तेव्हा भूमिकंपातून वाचलेल्या प्रत्येकाने भयभीत होऊन स्वर्गीय परमेश्वराचे गौरव केले. दुसरा अनर्थ संपला; पण पाठोपाठ तिसरा अनर्थ लवकर येत आहे.
प्रकटी 11:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर काठीसारखा एक ‘बोरू’ कोणीएकाने मला दिला, आणि म्हटले : “ऊठ, देवाचे मंदिर, वेदी व त्यात उपासना करणारे लोक ह्यांचे माप घे. तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’ माझे दोन साक्षी ह्यांना मी अधिकार देईन आणि ते तरट पांघरून एक हजार दोनशे साठ दिवस संदेश सांगतील.” ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे’ व ‘दोन समया’ ही ते आहेत. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास ‘त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैर्यांना खाऊन टाकतो;’ कोणी त्यांना उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडू नये’ म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याचे रक्त करण्याचा’ अधिकार त्यांना पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला ‘सर्व पीडांनी पीडित करण्याचाही’ त्यांना अधिकार आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर ‘अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील’ आणि ‘त्यांना जिंकून’ जिवे मारील; आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर, आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यांतील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरांत ठेवू देणार नाहीत. आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व ‘उल्लास करतील’ व एकमेकांना भेटी पाठवतील; कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्यांना पीडा दिली होती. पुढे साडेतीन दिवसांनंतर ‘जीवनाचा आत्मा’ देवापासून येऊन ‘त्यांच्यामध्ये शिरला तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले;’ आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे ‘भय वाटले.’ तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपल्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैर्यांच्या देखत ‘स्वर्गात’ वर गेले. त्याच घटकेस ‘मोठा भूमिकंप’ झाला. तेव्हा त्या नगराचा दहावा भाग ‘पडला,’ भूमिकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीची भयभीत होऊन त्यांनी ‘स्वर्गीय देवाचा’ गौरव केला. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, तिसरा अनर्थ लवकर होणार आहे.
प्रकटी 11:1-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर काठीसारखी एक मोजपट्टी मला देण्यात आली व सांगण्यात आले, “जा, देवाचे मंदिर, वेदी ह्यांचे माप घे आणि तिथे उपासना करणाऱ्यांची गणती कर. मात्र मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस. कारण ते यहुदीतर लोकांना दिले आहे. ते लोक बेचाळीस महिने पवित्र नगरी तुडवतील. मी माझे दोन साक्षीदार पाठवीन आणि ते गोणपाट पांघरून त्या एक हजार दोनशे साठ दिवसांत संदेश घोषित करतील.” पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारे दोन ऑलिव्ह वृक्ष व दोन समया हे ते साक्षीदार आहेत. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडांतून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यांस खाऊन टाकतो. कोणी त्यांना उपद्रव करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला ह्याचप्रमाणे ठार मारण्यात येईल. त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयाचा त्यांना अधिकार दिलेला आहे. पाण्याचे रक्त करण्याचा आणि वाटेल तितक्यांदा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी साक्ष देण्याचे काम पूर्ण केल्यावर अथांग विवरातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून ठार मारील. जिथे त्यांच्या प्रभूला क्रुसावर चढविण्यात आले होते त्या महान नगराच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. ह्या नगराला प्रतीकात्मक रीत्या सदोम किंवा इजिप्त म्हटलेले आहे. सर्व लोक, वंश, भाषा बोलणारे आणि राष्ट्रे ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरीत ठेवू देणार नाहीत. त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उ्रास करतील व एकमेकांस भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस पीडा दिली होती. पुढे साडेतीन दिवसांनंतर जीवनदायक आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये संचारला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांचा थरकाप उडाला. तेव्हा स्वर्गातून निघालेली उच्च वाणी त्यांनी त्यांच्याबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. त्याच घटकेस भीषण भूकंप झाला. तेव्हा त्या शहराच्या दहाव्या भागाचा विध्वंस झाला. भूकंपाने सात हजार माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गातील देवाचा गौरव केला. दुसरा अनर्थ होऊन गेला आहे. परंतु पाहा, तिसरा अनर्थ लवकरच होणार आहे!