स्तोत्रसंहिता 89:38-52
स्तोत्रसंहिता 89:38-52 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस. तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास. तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस. सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे. तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस. तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस. तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस. तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस. हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल? माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय? कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत? हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे; आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण. हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात; ते तुझ्या अभिषिक्ताच्या पावलांची थट्टा करतात. परमेश्वरास सदासर्वकाळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.
स्तोत्रसंहिता 89:38-52 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात. तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे. त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे. येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्यांकरिता घृणापात्र झाला आहे. तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे. तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे. तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे. त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय? कुठवर तुमचा क्रोधाग्नी भडकत राहणार? माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा. तुम्ही मानवाला किती व्यर्थ जीवन जगण्यासाठी निर्माण केले! कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही, कोण स्वतःला अधोलोकाच्या सत्तेपासून सोडवू शकेल? सेला हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली? हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू! याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले. याहवेहचे सदासर्वकाळ स्तवन होवो! आमेन व आमेन.
स्तोत्रसंहिता 89:38-52 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तरीपण तू आपल्या अभिषिक्ताचा त्याग केलास, त्याचा अव्हेर केलास, त्याच्यावर संतप्त झालास. तू आपल्या सेवकाशी केलेला करार अवमानला आहेस, त्याचा मुकुट भूमीवर टाकून भ्रष्ट केला आहेस. तू त्याचे सर्व तट मोडून टाकले आहेत त्याच्या गढ्या जमीनदोस्त केल्या आहेत. सर्व येणारेजाणारे त्याला लुटतात; तो आपल्या शेजार्यापाजार्यांना निंदेचा विषय झाला आहे. त्याच्या शत्रूंचा उजवा हात तू उंच केला आहेस; तू त्याच्या सर्व वैर्यांना हर्षवले आहेस. तू त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहेस. लढाईत त्याला टिकाव धरू दिला नाहीस. तू त्याला निस्तेज केले आहेस, त्याचे राजासन तू जमीनदोस्त केले आहेस. त्याच्या तरुणपणाचे दिवस तू खुंटवले आहेस तू त्याला लज्जेने वेष्टले आहेस. (सेला) हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ लपून राहणार काय? तुझा संताप अग्नीसारखा कोठवर भडकत राहणार? माझे आयुष्य किती अल्प आहे ह्याची आठवण कर; तू सर्व मानवजात निर्माण केलीस ती व्यर्थच काय? असा कोण मनुष्य आहे की, तो जिवंतच राहील, मृत्यू पावणार नाही? अधोलोकाच्या कबजातून आपला जीव कोण सोडवील? (सेला) हे प्रभू, ज्यांविषयी तू दाविदाशी आपल्या सत्यतेने शपथ वाहिलीस, ती तुझी पूर्वीची दयेची कृत्ये कोठे आहेत? हे प्रभू, तुझ्या सेवकाची निंदा होत आहे, सर्व थोर राष्ट्रांनी केलेली माझी निंदा मी हृदयात कशी वागवत आहे, ह्याची आठवण कर. हे परमेश्वरा, हे तुझे शत्रू निंदा करतात, पदोपदी तुझ्या अभिषिक्ताची निंदा करतात. परमेश्वर सदासर्वकाळ धन्यवादित असो. आमेन, आमेन.