स्तोत्रसंहिता 73:16-28
स्तोत्रसंहिता 73:16-28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तरी या गोष्टी मी समजण्याचा प्रयत्न केला, पण त्या माझ्यासाठी खूप कठीण होत्या. मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो, आणि नंतर त्यांच्या भवितव्याचा शेवट मला समजून आला. खचित तू त्यांना निसरड्या जागी ठेवतो; त्यांना तू खाली नाशात पाडतोस. कसे अचानक ते उध्वस्त झाले. आणि भयानक दहशतीत ते संपूर्ण नष्ट झाले. जागा झालेल्या मनुष्यास जसे स्वप्न निरर्थक वाटते; तसे हे प्रभू, जेव्हा तू जागा होशील, तेव्हा त्यांचे ते स्वप्न तुच्छ मानशील. कारण माझे हृदय दुःखीत झाले होते, आणि मी खोलवर घायाळ झालो. मी अज्ञानी होतो आणि सूक्ष्मदृष्टीची उणीव होती; मी तुझ्यापुढे मूर्ख प्राण्यासारखा होतो. तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे. तू आपल्या उपदेशाने मला मार्ग दाखवशील आणि त्यानंतर तू मला गौरवात स्वीकारशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय कोणी प्रिय नाही? माझा देह आणि माझे हृदय दुर्बल होत आहेत, पण देव सर्वकाळ माझ्या हृदयाचे सामर्थ्य आहे. जे तुझ्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; जे तुझ्याशी अविश्वासू आहेत त्या सर्वांचा तू नाश करशील. पण माझ्याविषयी म्हटले, तर देवाजवळ जाणे यामध्येच माझे कल्याण आहे. मी प्रभू परमेश्वरास आपले आश्रयस्थान केले आहे. मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करीन.
स्तोत्रसंहिता 73:16-28 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ही गोष्ट समजण्यासाठी मी विचार करू लागलो, तेव्हा त्याचे आकलन मला अत्यंत कठीण वाटू लागले. मग शेवटी मी परमेश्वराच्या पवित्रस्थानात गेलो, तेव्हा दुष्टांचा शेवट काय होतो हे मला कळून आले. निश्चित तुम्ही त्यांना निसरड्या भूमीवर ठेवले आहे; तुम्ही त्यांना सर्वनाशाकडे खाली लोटून द्याल. क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल. जसे जागे होणाऱ्या मनुष्याला स्वप्न पडते; त्याचप्रमाणे हे प्रभू, तुम्ही जागे व्हाल तेव्हा त्यांचे दुस्वप्न तुच्छ जाणाल. जेव्हा माझे हृदय दुःखित झाले आणि माझा आत्मा कटुतेने भरून गेला होता, त्यावेळस मी मूर्ख आणि अज्ञानी होतो; मी तुमच्यापुढे जनावरासारखा होतो! तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे. तुमची सल्लामसलत माझे मार्गदर्शन करेल, आणि त्यानंतर गौरवात तुम्ही माझा स्वीकार कराल. स्वर्गात तुमच्याशिवाय माझे कोण आहे? पृथ्वीवर तुमच्याएवढे प्रिय मला दुसरे कोणीही नाही. माझे शरीर व माझे हृदय खचेल, तरी परमेश्वर माझ्या हृदयाचे सामर्थ्य असून सर्वकाळचा माझा वाटा आहेत. जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्यांना तुम्ही नष्ट करता. परंतु माझ्यासाठी परमेश्वराच्या सहवासात राहणे खूप सुंदर आहे. मी याहवेह माझे प्रभू यांना आश्रयस्थान केले आहे. जेणेकरून मी तुमच्या सर्व महान कृत्यांची घोषणा करेन.
स्तोत्रसंहिता 73:16-28 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ही गोष्ट मला समजावी म्हणून तिचा विचार करत होतो, तोपर्यंत ती मला फार दुःखदायक वाटली; पण मी देवाच्या पवित्रस्थानात गेलो आणि त्या लोकांचा शेवट मनात आणला तेव्हा ती मला समजली. खचीत तू त्यांना निसरड्या जागांवर उभे करतोस, त्यांना पाडून त्यांचा नाश करतोस. एका क्षणात त्यांची कशी धूळधाण झाली आहे! भयाने ते अगदी गांगरून गेले आहेत; जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानशील. माझे मन खिन्न झाले व माझे अंतर्याम व्यथित झाले. मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो. तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस. तू बोध करून मला मार्ग दाखवशील, आणि त्यानंतर गौरवाने माझा स्वीकार करशील. स्वर्गात तुझ्याशिवाय मला कोण आहे? पृथ्वीवर मला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही प्रिय नाही. माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे. पाहा, जे तुझ्यापासून दूर जातात ते नष्ट होतात. अनाचार करून बहकून जाणार्या सर्वांचा तू समूळ नाश करतोस. माझ्याविषयी म्हटले तर देवाजवळ जाणे ह्यातच माझे कल्याण आहे; मी प्रभू परमेश्वराला आपले आश्रयस्थान केले आहे, ह्यासाठी की, मी तुझी सर्व कृत्ये जाहीर करावीत.