स्तोत्रसंहिता 71:1-8
स्तोत्रसंहिता 71:1-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे परमेश्वरा, मी तुझ्यात आश्रय घेतला आहे; मला कधीही लज्जित होऊ देऊ नको. मला सोडव आणि तुझ्या न्यायीपणात मला सुरक्षित ठेव; तू आपला कान मजकडे लाव आणि माझे तारण कर. मला नेहमी आश्रय मिळावा म्हणून माझा तू खडक हो; तू मला तारावयास आज्ञा दिली आहे, कारण तू माझा खडक आणि दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, तू मला दुष्टांच्या हातातून वाचव, अन्यायी आणि निष्ठूर मनुष्याच्या हातातून मला वाचव. कारण हे प्रभू, तू माझी आशा आहेस. मी लहान मूल होतो तेव्हापासूनच तू माझा भरवसा आहे. गर्भापासून तूच माझा आधार आहेस; माझ्या आईच्या उदरातून तूच मला बाहेर काढले; माझी स्तुती नेहमी तुझ्याविषयी असेल. पुष्कळ लोकांस मी कित्ता झालो आहे; तू माझा बळकट आश्रय आहे. माझे मुख दिवसभर तुझ्या स्तुतीने आणि सन्मानाने भरलेले असो.
स्तोत्रसंहिता 71:1-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे; मला लज्जित होऊ देऊ नका. तुमच्या नीतिमत्वानुसार मला वाचवा आणि सोडवा; तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा आणि माझे तारण करा. मी सदैव जाऊ शकेन असे माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा; तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या, कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात. परमेश्वरा, मला दुष्ट लोकांच्या पंजातून सोडवा, अन्यायी आणि क्रूर लोकांच्या तावडीतून मला मुक्त करा. प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे. जन्मापासूनच मी तुमच्यावर अवलंबून आहे; तुम्ही मला माझ्या आईच्या गर्भातून बाहेर आणले. मी सर्वकाळ तुमची स्तुती करेन. अनेक लोकांसाठी मी एक उदाहरण झालो आहे; तुम्ही माझे प्रबळ शरणस्थान आहात. माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.
स्तोत्रसंहिता 71:1-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय धरला आहे; मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायनीतीने माझा उद्धार कर; माझ्याकडे आपला कान लाव व माझे तारण कर; मला नेहमी थारा मिळावा म्हणून माझ्यासाठी निवासाचा खडक हो; माझे संरक्षण करण्याचे तू ठरवले आहेस. कारण तू तर माझा गड व माझा दुर्ग आहेस. हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर. कारण, हे प्रभू, परमेश्वरा, तूच माझे आशास्थान आहेस; माझ्या तरुणपणापासून माझे श्रद्धास्थान आहेस. जन्मापासून तूच माझा आधार आहेस; मातेच्या उदरातून निघाल्यापासून तूच माझा कल्याणकर्ता आहेस; मी तुझी स्तुती निरंतर करीन. पुष्कळ लोकांना मी आश्चर्याचा विषय झालो आहे; तरी तू माझा खंबीर आश्रय आहेस. माझ्या मुखात तुझे स्तुतिस्तोत्र सदा राहो; त्यातून दिवसभर गौरवपर शब्द निघोत.